Uday Kotak GDP Warning: एप्रिल-जून तिमाहीत भारताचा जीडीपी अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे ७.८ टक्के राहिल्याने आशावाद निर्माण झाला आहे. मात्र भू-राजकीय तणाव, एआयची वेगाने होणारी प्रगती आणि अमेरिकेतील सरकारी रोख्यांच्या परताव्यातील अस्थिरता पाहता, देशाला गाफील राहून चालणार नाही, असे मत ज्येष्ठ बँकर उदय कोटक यांनी व्यक्त केले. आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी आकडेवारीवर एक्सवरील एका पोस्टद्वारे प्रतिक्रिया देताना उदय कोटक म्हणाले की, इराणमधील संघर्षाच्या तीव्र काळातही भारताने आपली क्षमता सिद्ध केली आहे.
भारताच्या जीडीपीच्या आकडेवारीवर भाष्य करताना उदय कोटक म्हणाले, “भारताची ही जीडीपी वाढ पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) ७.८ टक्के होती. हा असा काळ होता ज्यावेळी इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला होता. मार्च आणि एप्रिलमधील चिंतांच्या पार्श्वभूमीवर भारताने लवचिकता दाखवली आहे. भारताने ३ ते ५ वर्षांच्या मुदतीसाठी सुमारे १०० अब्ज डॉलर्सहून अधिक परकीय चलन ठेवींच्या रूपात एक प्रकारचा विमाच घेतला आहे.”
जीडीपीचे आकडे भारताच्या बाजूने असले तरी कोटक यांनी सावध राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “मध्य-पूर्वेतील प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत, एआयचा खेळ जोरात सुरू आहे आणि अमेरिकन सरकारी रोख्यांवरील परतावाही दिशाहीन झाला आहे. आपल्यासाठी, आता चांगली वेळ आहे, पण अजून बरेच काम करायचे आहे आणि त्यामुळे आपण गाफील राहू नये.”
भारताचा जीडीपी चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के नोंदविण्यात आल्यानंतर माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी यावर प्रतिक्रिया दिली होती. ‘जी-२०’ परिषदेशी निगडित बैठकीसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाच सीतारामन यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून जीडीपीवर भाष्य केले होते.
“चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या जीडीपीची आकडेवारी काल जाहीर झाली. जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरेल असा भारताने ७.८ टक्के जीडीपी नोंदविला आहे. जागतिक पातळीवर आव्हाने असतानाही भारताने ही कामगिरी केली आहे. पहिल्या तिमाहीत झालेली ही वाढ पुढे संपूर्ण आर्थिक वर्षात दिसून येईल”, असे अर्थमंत्री म्हणाल्या होत्या.
अंदाजापेक्षा सरस कामगिरी
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत जीडीपी दर ७ टक्के राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने वर्तविला होता. प्रत्यक्षात पहिल्या तिमाहीत जीडीपीची कामगिरी यापेक्षा सरस राहिली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षासाठी रिझर्व्ह बँकेचा ६.७ टक्क्यांचा अंदाज आहे. आता अर्थमंत्र्यांनी पहिल्या तिमाहीप्रमाणेच संपूर्ण आर्थिक वर्षात विकास दर राहील, असे भाकीत केले आहे. चालू आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीची विकासदराची आकडेवारी ३० नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
