World Gold Council India Gold Demand Q3 : उच्च आयात शुल्क, सोन्याच्या किमतीतील वाढ आणि खरेदी मर्यादित ठेवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन यामुळे देशातील सोन्याच्या मागणीत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत वार्षिक तुलनेत २९ टक्क्यांची घट झाली. या तिमाहीत सोन्याची मागणी १६२.५ टनांवर आली असून, संपूर्ण वर्षासाठी मागणी ६२५ ते ६७५ टनांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूजीसी) व्यक्त केला आहे.

डब्ल्यूजीसीच्या मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या ‘तिसरी तिमाही २०२६ : सोन्याच्या मागणीचा कल’ या अहवालानुसार, २०२५ मधील याच तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी २२९.८ टन होती. मागणीत घट झाली असली, तरी मूल्याच्या दृष्टीने मात्र तीन टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. जुलै ते सप्टेंबरदरम्यान सोन्याच्या मागणीचे मूल्य २ लाख ४१ हजार ९०० कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षी याच काळात ते २ लाख ३५ हजार ९० कोटी रुपये होते. या तिमाहीत सोन्याचा सरासरी भाव प्रतिऔंस ४,२६२ डॉलर (दहा ग्रॅमसाठी १,४८,८९१ रुपये) होता. गेल्या वर्षी याच काळात हा भाव प्रतिऔंस ३,४५७ डॉलर (दहा ग्रॅमसाठी १,०२,२८७ रुपये) होता. हे दर आयात शुल्क आणि वस्तू व सेवा कर वगळून आहेत.

उच्च किमतींचा ग्राहकांच्या खरेदीच्या निर्णयांवर परिणाम झाला असला, तरी सोन्याच्या मागणीतील लवचिकता कायम आहे. ग्राहकांनी खरेदीचे प्रमाण आणि परवडणारी किंमत यांचा समतोल साधत सोन्याला दीर्घकालीन मूल्याच्या दृष्टीने प्राधान्य दिले आहे, असे डब्ल्यूजीसीचे भारतातील प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन यांनी सांगितले. तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे काही ग्राहकांनी पुढे ढकललेली खरेदी केली. विवाह आणि सणासुदीच्या खरेदीचाही मागणीला आधार मिळाला. विशेषतः दक्षिण भारतात ऑगस्टमध्ये प्रमुख सण असल्याने दागिन्यांच्या खरेदीला चालना मिळाली. वाढत्या किमतींमुळे ग्राहक हलके दागिने आणि जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन दागिने घेण्यास प्राधान्य देत आहे. आगामी सणासुदीचा आणि विवाहांचा हंगाम सोन्याच्या मागणीला आधार देईल, असा डब्ल्यूजीसीचा अंदाज आहे. सणासुदीच्या काळापूर्वी सराफांकडून सुरू असलेली तयारी आणि हंगामी खरेदीच्या वातावरणातील सुधारणा ही सकारात्मक चिन्हे आहेत. सोन्याच्या किमती उंचावलेल्या राहिल्या, तरी ग्राहक हलक्या वजनाच्या दागिन्यांची खरेदी आणि जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन दागिने घेण्याच्या पर्यायांचा वापर करतील. त्यामुळे संपूर्ण वर्षातील सोन्याची मागणी ६२५ ते ६७५ टनांच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे.

दागिन्यांची मागणी २० टक्क्यांनी घटली

सोन्याच्या दागिन्यांची मागणी जुलै ते सप्टेंबरदरम्यान २० टक्क्यांनी घटून ९९.९ टनांवर आली. गेल्या वर्षी याच तिमाहीत ही मागणी १२५ टन होती. मात्र, दागिन्यांच्या मागणीचे मूल्य १६ टक्क्यांनी वाढून १,४८,७०० कोटी रुपयांवर पोहोचले. सोन्याची नाणी आणि बार यांच्या मागणीत ४० टक्क्यांची घट होऊन ती ५५ टनांवर आली. गेल्या वर्षी याच तिमाहीत ही मागणी ९१.६ टन होती. गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडांमधील (ईटीएफ) मागणीही ५० टक्क्यांनी घटून ५.३ टनांवर आली. गेल्या वर्षी याच काळात ती १०.७ टन होती. रिझर्व्ह बँकेने जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीत सोन्याची खरेदी केली नाही. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेने ०.२ टन सोन्याची खरेदी केली होती.

आयातीत ४६ टक्क्यांची घट

तिमाहीत भारतातील सोन्याची निव्वळ आयात ४६ टक्क्यांनी घटून ११४.१ टनांवर आली. गेल्या वर्षी याच काळात ती २११.९ टन होती. सोन्याच्या पुनर्वापरातून उपलब्ध झालेले सोनेही १२ टक्क्यांनी घटून १९.२ टनांवर आले. गेल्या वर्षी याच तिमाहीत हे प्रमाण २१.८ टन होते.

जागतिक सोन्याच्या मागणीत घट

सोन्याच्या दरातील अनिश्चितता आणि विक्रमी उच्च किमतींमुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या मागणीत चालू वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत वार्षिक तुलनेत एक टक्का घट झाली आहे. या तिमाहीत जागतिक सोन्याची मागणी १,३६९ टनांवर आली आहे, अशी माहिती डब्ल्यूजीसीने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून दिली. सोन्याच्या उच्च दरांचा सर्वाधिक परिणाम दागिन्यांच्या मागणीवर झाला. या तिमाहीत जागतिक दागिन्यांची मागणी वार्षिक तुलनेत १७ टक्क्यांनी घटून ३१३ टनांवर आली. २०२० मध्ये करोना महामारीमुळे प्रभावित झालेल्या तिसऱ्या तिमाहीतील ३३१ टनांच्या मागणीपेक्षाही ही कमी आहे. दागिन्यांच्या मागणीची ही आतापर्यंतची तिसऱ्या तिमाहीतील नीचांकी पातळी ठरली आहे.