Gold Silver Import Duty Hike India Mohandas Pai Warning: भारताच्या ढासळत्या रुपयाला सावरण्यासाठी आणि व्यापारी तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक कठोर पाऊल उचलले आहे. १२ मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सोने आणि चांदीवरील एकूण आयात शुल्क आता १५ टक्क्यांवर पोहोचले आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिक क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, उद्योजक आणि आरिन कॅपिटलचे अध्यक्ष मोहनदास पै यांनी या निर्णयामुळे ‘तस्करी’, ‘हवाला’ आणि ‘भ्रष्टाचाराचा’ धोका वाढल्याचे म्हटले आहे.

नरेंद्र मोदी सर या निर्णयामुळे तस्करी, भ्रष्टाचार आणि…

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोहनदास पै म्हणाले, “नरेंद्र मोदी सर या निर्णयामुळे तस्करी, भ्रष्टाचार आणि हवाला व्यवहारांना चालना मिळेल. त्यापेक्षा, एक वर्षासाठी ‘भांडवली नफा कर’ (Capital Gains Tax) रद्द करून सोने आणि चांदीच्या पुनर्वापराला (Recycling) प्रोत्साहन द्यावे, हा अधिक उत्तम उपाय ठरेल.”

मोहनदास पै यांनी यावेळी आपल्या पोस्टमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि निती आयोगालाही टॅक केले आहे. त्यांच्या या पोस्टवर वित्तीय क्षेत्रातील अनेकांनी प्रतिक्रिया देत या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.

अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनांमध्ये काय आहे?

अर्थ मंत्रालयाने १२ मे रोजी जारी केलेल्या सीमाशुल्क अधिसूचनांद्वारे सोने आणि चांदीच्या आयात शुल्कांतील या बदलांची माहिती दिली आहे. हे सुधारित दर १३ मे पासून अंमलात आले आहेत.

या अधिसूचनांनुसार, सरकारने सोने आणि चांदीच्या आयातीच्या विविध श्रेणींवरील मूळ सीमा शुल्क (Basic Customs Duty) ५ टक्क्यांवरून वाढवून १० टक्के केले आहे. तर ५ टक्के कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर (AIDC) कायम ठेवला आहे, ज्यामुळे एकूण आयात कर १५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

रुपयाची सर्वात वाईट कामगिरी

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि वाढलेल्या सोने आयातीमुळे भारताच्या चालू खात्यातील तूट आणि चलनावर (रुपया) दबाव येत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, रुपया यावर्षी आशियातील सर्वात कमकुवत कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक राहिला आहे आणि अलीकडेच डॉलरच्या तुलनेत त्याने विक्रमी नीचांक गाठला आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, तस्करीला आळा घालण्यासाठी आणि रत्न व दागिने क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी भारताने जुलै २०२४ मध्ये सोने आणि चांदीवरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत कमी केले होते.