पीटीआय, नवी दिल्ली
देशाच्या औद्योगिक उत्पादकतेचा वेग मापणाऱ्या, औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) जुलै २०२६ मध्ये वार्षिक तुलनेत ६.७ टक्के वाढ नोंदवण्यात आली. सुधारित आकडेवारीनुसार जूनमधील ८.८ टक्क्यांच्या पातळीच्या तुलनेत तो काहीसा मंदावला असून, खाण आणि उत्खनन क्षेत्रातील घसरणीचा परिणाम जुलैमधील वाढ खुंटण्यात दिसून आला.

नव्या मालिकेतील ‘आयआयपी’ची ही चौथी मासिक आकडेवारी आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये उत्पादन क्षेत्राची वाढ ७.३ टक्के, तर वीज निर्मिती आणि गॅस पुरवठा क्षेत्राची वाढ ८.७ टक्के राहिली. पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व कचरा व्यवस्थापन क्षेत्रात ७.४ टक्के वाढ झाली. मात्र, खाणकाम आणि उत्खनन क्षेत्राच्या उत्पादनात जुलैमध्ये ०.९ टक्क्यांची घसरण झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात या क्षेत्राने १०.७ टक्के वाढ नोंदवली होती. गेल्या वर्षी म्हणजे जुलै २०२५ मधील एकूण आयआयपी वाढ ५.४ टक्के होती.

उत्पादन क्षेत्रात, २३ पैकी १९ उद्योग गटांनी जुलै २०२६ मध्ये सकारात्मक वार्षिक वाढ नोंदवली आहे. मोटार वाहने, ट्रेलर आणि सेमी-ट्रेलरचे उत्पादन (२२.२ टक्के), विद्युत उपकरणांचे उत्पादन (२८.३ टक्के) आणि यंत्रसामग्री व उपकरणांचे उत्पादन (१२.१ टक्के). मोटार वाहने, ट्रेलर आणि सेमी-ट्रेलरचे उत्पादन या उद्योग गटात, वाहनांचे घटक, सुटे भाग आणि ॲक्सेसरीज, प्रवासी मोटार आणि व्यावसायिक वाहने या वस्तू-गटांनी वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विद्युत उपकरणांचे उत्पादन या उद्योग गटात, विद्युत सर्किट्स सुरू/बंद करण्यासाठी किंवा त्यांच्या संरक्षणासाठीची विद्युत उपकरणे, यूपीएस आणि सॉलिड-स्टेट ड्राइव्ह्ज तसेच ऑप्टिकल फायबर्स आणि केबल्ससाठीचे एंड-फेस कनेक्टर्स या वस्तू-गटांनी वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.

भांडवली वस्तू उत्पादनात दमदार वाढ

वापराधारित वर्गीकरणानुसार जुलैमध्ये प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनात ४.१ टक्के, भांडवली वस्तूंमध्ये १६.१ टक्के, मध्यवर्ती वस्तूंमध्ये १० टक्के आणि पायाभूत सुविधा व बांधकामाशी संबंधित वस्तूंमध्ये ६.९ टक्के वाढ झाली. ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तूंच्या उत्पादनात १०.५ टक्के वाढ झाली; मात्र ग्राहकांच्या दैनंदिन वापरातील अन्य वस्तूंच्या उत्पादनात १ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. दरम्यान, जून २०२६ च्या आयआयपी वाढीचा पूर्वी जाहीर केलेला ७.३ टक्क्यांचा प्राथमिक अंदाज सुधारून ८.८ टक्के करण्यात आला आहे.