देशातील औद्योगिक उत्पादनात घसरण होऊन जानेवारी महिन्यात ते तीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर नोंदविण्यात आले. यासाठी निर्मिती आणि खाणकाम क्षेत्राची खराब कामगिरी कारणीभूत ठरल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीतून समोर आले.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, औद्योगिक उत्पादन निर्देशांक जानेवारीत ४.८ टक्के नोंदविण्यात आला. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात तो ५.२ टक्के पातळीवर होता. ही निर्देशांकाची तीन महिन्यांती नीचांकी पातळी असून, तो ऑक्टोबर २०२५ मध्ये ०.५ टक्के पातळीवर होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये तो ७.२ टक्क्यांवर पोहोचला, डिसेंबर २०२५ मधील औद्योगिक उत्पादनाची सुधारित आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, हा दर ७.८ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर नेण्यात आला आहे.
यंदाच्या जानेवारीमध्ये निर्मिती क्षेत्रातील वाढीचा दर ४.८ टक्क्यांनी कमी झाला आहे. याचवेळी खाणकाम क्षेत्रातील वाढीचा दर कमी होऊन ४.३ टक्क्यांवर आला आहे तर ऊर्जा क्षेत्रातील वाढीचा दर ५.१ टक्के आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी या कालावधीत औद्योगिक उत्पादनातील वाढीचा दर ४ टक्के नोंदविण्यात आला आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात याच कालावधीत हा दर ४.२ टक्के होता.
