मुंबई: सरलेल्या एप्रिल ते सप्टेंबर सहामाहीत कंपन्यांनी प्राथमिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून विक्रमी ९४,२०५ कोटी रुपयांची निधी उभारणी केली आहे. ‘एनएसई’सह मोठ्या आकाराच्या समभाग विक्रीच्या प्रस्तावामुळे निधी उभारणीला मोठी चालना मिळाली, असे ‘प्राइमडेटाबेस’ने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालाने स्पष्ट केले.

एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत मुख्य मंचावर एकूण ७८ कंपन्यांचे आगमन झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत ६५ कंपन्यांनी बाजाराला आजमावले आणि त्या माध्यमातून ६९,५३३ कोटी रुपये उभारण्यात आले. त्या तुलनेत यंदा उभारली गेलेली रक्कम ३५ टक्क्यांनी जास्त आहे.

उल्लेखनीय म्हणजे या सहा महिन्यांच्या बहुतांश काळात शेअर बाजारात कमालीची अस्थिरता होती. तरीही निधी उभारणीचा हा विक्रम प्रस्थापित झाला आहे, असे प्राइमडेटाबेसचेचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव हल्दिया यांनी सांगितले. पहिल्या तीन महिन्यांत अत्यंत संथ गतीने केवळ ३,७९४ कोटी रुपये उभारले गेले होते.

२.७८ लाख कोटींचे प्रस्ताव प्रतीक्षेत

आयपीओ बाजारातील आगामी चित्रही सक्रिय राहण्याची शक्यता आहे. सध्या १४५ कंपन्यांना भांडवली बाजार नियामक सेबीची मंजुरी मिळाली असून, या कंपन्या सुमारे २.७८ लाख कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहेत. शिवाय आणखी १०२ कंपन्यांचे सुमारे १.८७ लाख कोटी रुपयांचे प्रस्ताव नियामकांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, सूक्ष्म व लघू उद्योग अर्थात एसएमई आयपीओ, संस्थात्मक समभाग विक्री, तसेच रिट्स आणि इन्व्हिट्स या माध्यमातून उभारलेला निधी जमेस धरल्यास, एकूण सार्वजनिक भांडवल उभारणीत ७५ टक्क्यांची वाढ झाली. या कालावधीत सर्व माध्यमांद्वारे एकूण २.४३ लाख कोटी रुपये जमा झाले असून, ही आतापर्यंतची निधी उभारणीची विक्रमी पातळी आहे.

एसएमई आयपीओंसह सर्व आयपीओंचा विचार केल्यास, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत निधी उभारणीने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. मागील वर्षाच्या याच कालावधीत त्याचे प्रमाण ७६,३३० कोटी रुपये होते.

सरासरी सूचिबद्धता लाभही दमदार

सहामाहीतील मोठ्या आयपीओंमध्ये एनएसईच्या २२,५६३ कोटी रुपयांच्या आयपीओचा समावेश आहे. याशिवाय एसबीआय फंड्स मॅनेजमेंटने ९,७९५ कोटी रुपये, तर मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेसने ९,२७५ कोटी रुपये उभारले. गुंतवणूकदारांच्या प्रतिसादाची आकडेवारी पाहिल्यास, ४२ आयपीओंमध्ये १० पटींपेक्षा अधिक भरणा करणारा प्रतिसाद मिळविला. ज्यातील २५ आयपीओंनी तर ५० पटींपेक्षा अधिक मागणी मिळविली. या आयपीओंच्या सूचिबद्धतेच्या दिवशीच्या सरासरी परताव्यातही वाढ झाली. या काळात सरासरी सूचिबद्धता लाभ १९ टक्के राहिला, जो मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत अवघा सात टक्के होता.