HSBC India Manufacturing PMI October : देशातील निर्मिती क्षेत्राच्या विस्ताराची गती ऑक्टोबर महिन्यात काही प्रमाणात मंदावली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या ‘एचएसबीसी इंडिया’च्या मासिक सर्वेक्षणात ही माहिती समोर आली असून, खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शवणारा ‘पीएमआय निर्देशांक’ ऑक्टोबरमध्ये ५४.७ गुणांवर नोंदवला गेला आहे.
निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या ‘एचएसबीसी इंडिया’च्या सर्वेक्षणावर आधारित ‘पीएमआय निर्देशांक’ ऑक्टोबर महिन्यात ५४.७ गुणांवर नोंदविण्यात आला. त्याआधीच्या (सप्टेंबर) महिन्यात हा निर्देशांक ५५.१ गुणांवर नोंदविला गेला होता. निर्देशांकात घसरण झाली असली तरी तो दीर्घकालीन सरासरीपेक्षा अधिक आहे. हा निर्देशांक ५० गुणांवर असल्यास विस्तापूरकता तर ५० गुणांखाली असल्यास आकुंचन दर्शवतो. कच्च्या मालासह ऊर्जेच्या किमतीत वाढ झाली असली तरी एकूण उत्पादन खर्चावरील महागाईचा दबाव कमी आहे. कंपन्यांनी बांगलादेश, कॅनडा, इंडोनेशिया, नेपाळ, ओमान, सौदी अरेबिया, श्रीलंका, ब्रिटन, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातीमधून व्यवसायाची वाढ नोंदविली आहे.
गेल्या महिन्यात नवीन कार्यादेश आणि उत्पादन यातील वाढ सौम्य राहिली. कंपन्यांकडून रोजगारात वाढ करण्यात आली असली तरी त्याचेही प्रमाण कमी आहे. जास्त उत्पादनाच्या गरजेमुळे सलग दुसऱ्या महिन्यात भरतीत वाढ झाली आहे मात्र, या भरतीचा वेग कमी आहे. निर्मिती क्षेत्रातील व्यवसायाचा आत्मविश्वासही कमजोर झाल्याचे समोर आले आहे. याचवेळी कंपन्यांकडून उत्पादनांचा साठा वाढविला जात आहे. गेल्या महिन्यात नवीन व्यवसायांच्या कार्यादेशात सातत्यपूर्ण वाढ झाली. त्याआधी सप्टेंबर महिन्यात निर्देशांक सात महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. त्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये निर्मिती क्षेत्राची कामगिरी काही प्रमाणात घसरली तरी ती सकारात्मक आहे.
आंतरराष्ट्रीय मागणीत भक्कम वाढ झाल्याने नवीन निर्यात कार्यादेश सहा महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. यातून उत्पादकांकडून मालाचा साठा वाढविला गेला असून, तो आठ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. जागतिक पातळीवरील अस्थिर परिस्थितीमुळे आगामी काळात टंचाई झाल्यास सावधगिरीचा उपाय म्हणून उत्पादकांकडून हे पाऊल उचलण्यात येत आहे, अशी माहिती एचएसबीसी इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी दिली.
