नवीन कार्यादेशासह उत्पादनात झालेली वाढीमुळे देशातील निर्मिती क्षेत्राने सरलेल्या सप्टेंबर महिन्यात सात महिन्यांतील उच्चांकी वाढ नोंदवल्याचे गुरूवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणातून समोर आले. देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या एचएसबीसी इंडियाद्वारे या क्षेत्रातील खऱेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या सर्वेक्षणावर आधारित ‘पीएमआय निर्देशांक’ सप्टेंबर महिन्यात ५५.१ गुणांवर नोंदविण्यात आला. त्याआधीच्या (ऑगस्ट) महिन्यात हा निर्देशांक ५२.८ गुणांवर नोंदविला गेला होता. सरलेल्या महिन्यात या निर्देशांकाने सात महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठून मोठी सुधारणा दर्शविली आहे. हा निर्देशांक ५० गुणांवर असल्यास विस्तापूरकता तर ५० गुणांखाली असल्यास आकुंचन दर्शवतो. रोजगाराच्या पातळीवरही या क्षेत्राची चांगली कामगिरी दिसून आली आहे. रोजगार निर्मितीत मेनंतरचची मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे.

निर्मिती क्षेत्राच्या देशांतर्गत आणि निर्यात मागणीत भक्कम वाढ गेल्या महिन्यात दिसून आली. यामुळे या क्षेत्रातील व्यवसाय सकारात्मकता चार महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. कच्चा माल आणि उत्पादनांच्या विक्री किमती जलद वाढ नोंदविण्यात आली असली तरी महागाईची पातळी सौम्य आहे. उद्योगांनी उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल खरेदी केला आहे. हा खरेदीचा स्तर ऑगस्टपेक्षा जास्त आहे. इलेक्ट्रॉनिक्स, खाद्यवस्तू, औषधनिर्माण आणि वस्त्रोद्योग या उद्योगांतील विक्रीचा स्तर फेब्रुवारीनंतरच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. ब्राझील, युरोप, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेतून निर्यात कार्यादेशात वाढ नोंदविण्यात आली आहे.

देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत सुधारली आहे. देशांतर्गत आणि बाह्य मागणीमुळे विक्री आणि उत्पादनात झालेल्या वाढीमुळे पीएमआय निर्देशांकाने भरीव वाढ नोंदविली आहे. याचबरोबर रोजगार निर्मितीतही मेनंतरची सर्वाधिक गती दिसून आली आहे. आगामी महिन्यात या क्षेत्राची कामगिरी सकारात्मक राहण्याची चिन्हे आहेत. – प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी इंडिया