India New Zealand Free Trade Agreement : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १०० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी देत असतानाच भारताने मोठा डाव टाकला आहे. भारत आणि न्यूझीलंडमधील बहुप्रतिक्षित मुक्त व्यापार करारावर (FTA) अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. येत्या २० ऑक्टोबर २०२६ (विजयादशमी) पासून हा करार प्रत्यक्षात लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी एक्स (X) वर पोस्ट करत या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली आहे. या वर्षीच्या सुरुवातीलाच भारत आणि युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार झाला होता. त्यानंतर हा दुसरा सर्वात मोठा करार आहे.

दोन्ही देशांसाठी विजय…

न्यूझीलंडच्या संसदेने १६ सप्टेंबर रोजी या करारावर शिक्कामोर्तब केल्यानंतर, दोन्ही देशांमधील व्यापाराला गती मिळाली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या करारावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “हा दोन्ही देशांसाठी एक विजय आहे आणि विजयादशमीच्या मुहुर्तात हा करार भारत आणि न्यूझीलंडच्या मैत्रीला एका नव्या शिखरावर घेऊन जाईल.”

भारत-न्यूझीलंड कराराची ठळक वैशिष्ट्ये

  • पुढील पाच वर्षांत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार २.४ अब्ज अमेरिकन डॉलरवरून ५ अब्ज अमेरिकन डॉलरवर नेण्याचे या कराराचे उद्दिष्ट आहे.
  • न्यूझीलंडने भारतीय निर्यातीसाठी आपल्या सर्व वस्तूंवर १०० टक्के शुल्कमुक्त प्रवेश दिला आहे. यामुळे कापड उद्योग, चर्मोद्योग, रत्ने-दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि प्रक्रिया केलेले अन्न यांसारख्या क्षेत्रांना मोठा फायदा होईल.
  • देशातील शेतकऱ्यांचे हित जपत भारताने दुग्धव्यवसाय, कांदा, साखर आणि काही विशिष्ट धातू यांसारख्या संवेदनशील क्षेत्रांना कराराच्या कक्षेतून बाहेर ठेवले आहे. न्यूझीलंडच्या एकूण निर्यातमूल्यापैकी सुमारे ९५ टक्के भाग कव्हर करत भारताने ७० टक्के टॅरिफ लाईन्स उघड्या केल्या आहेत.
  • न्यूझीलंड आगामी १५ वर्षांत भारतात २० अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार असून, यामुळे दीर्घकालीन आर्थिक सहकार्याला बळकटी मिळेल.

भारतीय तरुणांसाठी न्यूझीलंडची दारे उघडणार

  • या करारामुळे भारतातून न्यूझीलंडमध्ये जाणाऱ्या कुशल कामगारांसाठी एक नवीन हंगामी रोजगार व्हिसा मार्ग तयार करण्यात आला आहे. यानुसार, ५,००० कुशल भारतीयांना ३ वर्षांपर्यंत काम करण्याची संधी मिळेल.
  • न्यूझीलंडच्या व्यापार करारात पहिल्यांदाच आयुष आणि योगा सारख्या भारतीय पारंपरिक वैद्यकीय पद्धतींना अधिकृत मिळणार आहे. यामध्ये योग प्रशिक्षक, आयुर्वेद तज्ज्ञ आणि भारतीय शेफ यांचा समावेश आहे.
  • १,००० तरुण भारतीयांना दरवर्षी १२ महिन्यांपर्यंत न्यूझीलंडमध्ये प्रवास करण्यासाठी ‘वर्किंग हॉलिडे व्हिसा’ मिळणार आहे. तसेच, पात्र भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यान आठवड्याला २० तास काम करण्याची आणि अभ्यास संपल्यानंतर ३ ते ४ वर्षांपर्यंतचा ‘पोस्ट-स्टडी वर्क व्हिसा’ मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी संसदेत ९३ विरुद्ध २९ मतांनी हा करार मंजूर झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. “१.४ अब्ज भारतीय ग्राहकांची बाजारपेठ आमच्या निर्यातदारांसाठी खुली झाली असून, यामुळे न्यूझीलंडमध्ये अधिक रोजगार आणि उच्च उत्पन्न मिळण्यास मदत होईल,” असे ते म्हणाले.