India Oman Undersea Pipeline Project: पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधील वारंवार उद्भवणारे धोके लक्षात घेता केंद्र सरकारने ऊर्जा (इंधन) सुरक्षेला प्राधान्य देण्यास सुरुवात केली असून, आखाती देशांतून थेट खोल समुद्रातील पाइपलाइनद्वारे गॅसचा पुरवठा निश्चित करण्याच्या योजनांना सरकार गती देत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ओमानपासून सुरू होणाऱ्या या पाइपलाइन प्रकल्पाला जर मंजुरी मिळाली, तर तो पूर्ण होण्यास पाच ते सात वर्षांचा कालावधी लागण्याची अपेक्षा आहे. यासाठी अंदाजित खर्च ४०,००० कोटी रुपये इतका आहे. याबाबत ‘इकोनॉमिक टाइम्स’ने वृत्त दिले आहे.
पेट्रोलियम मंत्रालय सरकारी मालकीच्या ‘GAIL’, ‘Engineers India’ आणि ‘Indian Oil Corp’ या कंपन्यांना सविस्तर व्यवहार्यता अहवाल (feasibility report) तयार करण्याचे निर्देश देण्याच्या तयारीत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. नवी दिल्लीस्थित खाजगी क्षेत्रातील समूह असलेल्या ‘South Asia Gas Enterprise’ (SAGE) ने सादर केलेल्या प्राथमिक व्यवहार्यता अभ्यासाच्या (pre-feasibility study) आधारे सरकार या दिशेने काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
“भारताने LNG स्पॉट मार्केटवरील अवलंबित्व झुगारून पुढे जाणे गरजेचे आहे”, असे एका अधिकाऱ्याने म्हटले. “पश्चिम आशियातून येणारी एक पाइपलाइन आपल्याला कोणत्याही मध्यस्थ देशावर किंवा सागरी मार्गावरील अडथळ्यांवर अवलंबून न राहता स्थिर आणि किफायतशीर दरात गॅस उपलब्ध करून देईल.”
इंधनाची प्रचंड गरज असलेला भारत आपल्या प्राथमिक ऊर्जा मिश्रणामध्ये गॅसचा वाटा वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याने, देशातील नॅचरल गॅसची मागणी सातत्याने वाढत आहे. सध्याचा वापर दररोज अंदाजे १९०-१९५ दशलक्ष घनमीटर (mmscmd) इतका असून, २०३० पर्यंत तो सुमारे २९०-३०० दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. विविध अंदाजांनुसार, केवळ LNG ची आयातच या दशकाच्या अखेरीस १८०-२०० दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचू शकते.
प्रकल्पाचे तपशील
प्रस्तावित गॅस पाइपलाइन अरबी समुद्राखालून २,००० किलोमीटरपर्यंत विस्तारलेली असेल आणि ती ओमानला थेट गुजरातच्या किनारपट्टीशी जोडेल. या पाइपलाइनद्वारे सुमारे ३१ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन नॅचरल गॅसचा पुरवठा केला जाईल.
या पाइपलाइनचा मार्ग अशा प्रकारे आखला जाईल की, तो ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मार्गे अरबी समुद्रातून जाईल. दरम्यान, या प्रकल्पातून भू-राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेले प्रदेश टाळले जातील. या प्रकल्पामुळे भारताला ओमान, यूएई, सौदी अरेबिया, इराण, तुर्कमेनिस्तान आणि कतार या देशांमधील गॅस साठ्यांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. हा असा प्रदेश आहे जिथे गॅसचे २५०० ट्रिलियन घनफूट साठे उपलब्ध आहेत.
