India Russia Crude Oil Import Data: जून महिन्यात रशियाकडून होणारी भारताची कच्च्या तेलाची आयात विक्रमी पातळीवर पोहोचू शकते, असे वक्तव्य ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ अनस अलहाज्जी यांनी व्यक्त केले आहे. हे वक्तव्य करताना अनस अलहाज्जी यांनी भारतीय बंदरांवर रशियन कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या संख्येकडे लक्ष वेधले आहे.

“मी जूनच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, या महिन्यात भराताची रशियन कच्च्या तेलाची आयात विक्रमी पातळीवर पोहोचली, तर मला अजिबात नवल वाटणार नाही. आता तीच परिस्थिती दिसून येत आहे. भारतीय बंदरांवर रशियन कच्च्या तेलाची वाहतूक करणारे इतके जहाज मी यापूर्वी कधीही पाहिले नाहीत”, असे एनजीपी एनर्जी कॅपिटल मॅनेजमेंट’चे मुख्य अर्थतज्ज्ञ अनस अलहाज्जी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

या पोस्टबरोबर अलहाज्जी यांनी ‘केप्लर’चा एक नकाशा देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये रशियन कच्च्या तेलाची वाहतूक करणारे अनेक जहाज भारतातील विविध बंदरांकडे जाताना दिसत आहेत.

सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) च्या अहवालात मे महिन्यात भारत हा रशियन जीवाश्म इंधनाचा (Fossil Fuels) जगातील दुसरा सर्वात मोठा खरेदीदार राहिल्याचे आणि अंदाजे ६.७ अब्ज डॉलर्स किमतीच्या रशियन हायड्रोकार्बन्सची आयात केल्याचे नुकतेच समोर आले होते. त्यांतर आल्यानंतर काही आठवड्यांनीच अलहाज्जी यांनी ही टिप्पणी केली आहे.

सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात रशियाकडून भारताने केलेल्या आयातीमध्ये कच्च्या तेलाचा वाटा सुमारे ८३ टक्के होता आणि त्याचे मूल्य ४.८ अब्ज युरो इतके होते. तसेच, तेल उत्पादने आणि कोळशाच्या आयातीचे मूल्य अनुक्रमे ५५० दशलक्ष युरो आणि ४२९ दशलक्ष युरो इतके होते. या अहवालात असे दिसून आले आहे की, मे महिन्यात भारताच्या कच्च्या तेलाच्या एकूण आयात प्रमाणात मागील महिन्याच्या तुलनेत ८ टक्के वाढ झाली आहे. या वाढीस रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीत झालेली २१ टक्क्यांची वाढ कारणीभूत ठरली.

रशियन तेलाच्या सर्वाधिक खरेदी कोणाकडून?

सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या मते, मे महिन्यात रशियाच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीत चीनचा वाटा ५० टक्के होता. त्यानंतर भारताचा वाटा ३६ टक्के तुर्कीचा वाटा ६ टक्के आणि युरोपियन युनियनचा वाटा ५ टक्के होता.