नवी दिल्ली : देशातील सेवा क्षेत्राला सरत्या एप्रिलमध्ये गती मिळाली असून, वाढीचा दर पाच महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे सेवा प्रदात्यांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेऐवजी देशांतर्गत पुरवठादारांकडे कल वाढल्याने या क्षेत्राचा विस्तार झाल्याचे बुधवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणातून समोर आले.
भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक एप्रिल महिन्यात ५८.८ गुणांवर नोंदला गेला. मार्चमध्ये तो ५७.५ गुणांवर होता. निर्देशांकाची ही गेल्या नोव्हेंबरनंतरची उच्चांकी पातळी आहे. सेवा क्षेत्राचा निर्देशांक ५० गुणांवर नोंदला गेल्यास विस्तार तर ५० गुणांखाली नोंदला गेल्यास आकुंचन झाल्याचे मानले जाते. स्पर्धात्मक किमती, ई-कॉमर्स आणि देशांतर्गत वाढलेली मागणी यामुळे सेवा क्षेत्राची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या सुरुवातीला कंपन्यानी जास्त मनुष्यबळ भरती केली आहे. नवीन व्यवसायातील वाढीमुळे अंशकालीन कर्मचारी आणि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची भरती वाढल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.
भारतीय सेवांना आंतरराष्ट्रीय पातळीवरून मागणी कमी झाली आहे. पश्चिम आशियातील युद्ध आणि पर्यटन क्षेत्रातील घसरण याचा परिणाम सेवा क्षेत्रावर झाला आहे. सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी कार्यचालन खर्चात वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये महिन्यात हा वाढीचा दर कमी असला तरी स्वयंपाकाचे तेल, अंडी, मांस, भाज्या या खाद्यवस्तूंसह स्वयंपाकाचा गॅस, कामगारांचा खर्च यातील वाढ आणि गॅस टंचाईमुळे महागाईत वाढ होत आहे. मात्र, महागाईत वाढ होऊनही कंपन्यांनी ग्राहकांवर अतिरिक्त खर्चाचा कमी बोजा टाकला, असे सर्वेक्षणाने नमूद केले आहे.
सेवा क्षेत्राची वाढ एप्रिलमध्ये पाच महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली. क्रियाकलाप आणि नवीन कार्यादेशात भक्कम वाढ झाली असली तरी निर्यातीत घट झाली आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे मागणीचा ओघ परदेशी बाजारपेठेकडून देशांतर्गत बाजारपेठेकडे वळू लागल्याचे दिसत आहे.
– प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी
