नवी दिल्ली : देशातील सेवा क्षेत्राची नवीन व्यवसायातील वाढ मार्चमध्ये मंदावली, ज्यामुळे या सरलेल्या महिन्यात या क्षेत्राच्या वाढीने १४ महिन्यांतील नीचांकी पातळी गाठल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणाने स्पष्ट केले.

देशातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक मार्च महिन्यात ५७.५ गुणांवर नोंदला गेला. फेब्रुवारीमध्ये हा निर्देशांक ५८.१ गुणांवर होता. निर्देशांकाने गेल्या महिन्यात जानेवारी २०२५ नंतरची नीचांकी पातळी नोंदवली आहे. तरी तो ५४.४ या दीर्घावधीच्या सरासरी गुणांकाच्या वर कायम असल्याचे अहवालाने सूचित केले आहे.

सेवा क्षेत्राचा निर्देशांक ५० गुणांवर नोंदला गेल्यास विस्तार तर ५० गुणांखाली नोंदला गेल्यास आकुंचन झाल्याचे मानले जाते. गेल्या महिन्यात कच्च्या मालाच्या किमतीत २०२२ नंतरची सर्वाधिक वेगवान वाढ अनुभवास आली. या कारणामुळे सेवांच्या किमतीत वाढ झाली असून, ग्राहक सेवा, वित्तीय व विमा या क्षेत्रात या दरवाढीचे प्रतिबिंब दिसून आले.

सेवा क्षेत्राच्या वाढीचा वेग मार्चमध्ये मंदावला असला तरी निर्यातीच्या नवीन कार्यादेशांत चांगली वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यात आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि अमेरिकेसह आखाती देशांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात विक्री मूल्यातील महागाईत वाढ होऊन ती सात महिन्यांतील उच्चांकी पोहोचली आहे. कारण कच्च्या मालाच्या किमतीत जून २०२२ नंतरची सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. चिकन, स्वयंपाकाचे तेल, अंडी, वीज, मासे, फळे, इंधन, मांस आणि वनस्पती तेल यांच्या किमतीत फेब्रुवारीपासून वाढ सुरू असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

सलग दुसऱ्या महिन्यात वाढीला घरघर

देशाच्या सेवा क्षेत्राच्या वाढीतील विस्तारपूरकता मार्च महिन्यात कायम राहिली. मात्र, वाढीतील वेग सलग दुसऱ्या महिन्यांत कमी नोंदविण्यात आला आहे. नवीन कार्यादेशांमुळे मागणी स्थिर आहे. सेवा पुरवठादार कंपन्या आगामी काळातील व्यवसायाबद्दल सकारात्मक आहेत, असे एचएसबीसी इंडियाच्या मुख्य अंर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी मत व्यक्त केले.

रोजगारात वाढ मात्र भक्कम

क्रियाशीलता किंचित मंदावूनही मार्चमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात सेवा क्षेत्रातील रोजगारात वाढ नोंदविण्यात आली. रोजगार निर्मितीचा वेग २०२५ च्या मध्यापासूनचा सर्वाधिक भक्कम आहे. व्यवसाय आत्मविश्वासातही वाढ दिसून येत असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे.