पीटीआय, नवी दिल्ली
देशांतर्गत मागणीतील वाढीमुळे देशांतर्गत मजबूत मागणी आणि नवीन कार्यादेशांमध्ये मोठी वाढ झाल्याच्या परिणामी, सप्टेंबरमध्ये सेवा क्षेत्रातील सक्रियता तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. जूननंतरची ही सेवा क्षेत्रातील सर्वाधिक वाढ असल्याचे मंगळवारी प्रसिद्ध मासिक अहवालाने स्पष्ट केले.

हंगामानुसार समायोजित ‘एचएसबीसी इंडिया’कडून सर्वेक्षणावर आधारीत सेवा क्षेत्राचा ‘पीएमआय’ ऑगस्टमधील ५४.१ वरून सप्टेंबरमध्ये ५५.२ वर पोहोचला. मात्र सप्टेंबरमधील दमदार सुधारणा असूनही, सेवा क्षेत्राच्या सरासरी वाढीचा वेग मागील तिमाहीच्या तुलनेत यंदा कमीच राहिला. प्रत्यक्षात करोनाच्या दुसऱ्या लाटेची छाया राहिलेल्या मार्च २०२२ अखेरच्या तिमाहीनंतरची ही सर्वात कमकुवत तिमाही कामगिरी ठरल्याचे अहवालात म्हटले आहे. सुमारे ४०० सेवा क्षेत्रातील कंपन्यांकडून प्रश्नावलीद्वारे मिळालेल्या प्रतिसादांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो.

सप्टेंबरमध्ये सेवा क्षेत्रातील वाढीला डिजिटल सेवा, अन्नविषयक सेवा, विमा, कर्ज, सॉफ्टवेअर, वाहतूक तसेच पर्यटन आणि प्रवास क्षेत्रातील वाढत्या मागणीचा आधार मिळाला. देशांतर्गत मागणीबरोबरच भारतीय सेवांसाठी आंतरराष्ट्रीय मागणीतही सुधारणा झाली. जर्मनी, संयुक्त अरब अमिराती (यूएई), ब्रिटन आणि अमेरिकेतून सेवांसाठी मागणी वाढल्याचे सर्वेक्षणातील सहभागी कंपन्यांनी सांगितले.

रोजगारनिर्मितीलाही चालना

नवीन कार्यादेशांत झालेली वाढ आणि आगामी प्रकल्पांमुळे सप्टेंबरमध्ये सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले. मात्र, ऑगस्टच्या तुलनेत रोजगारनिर्मितीचा वेग काहीसा कमी राहिला. दरम्यान, दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस कंपन्यांवरील खर्चाचा दबावही कमी झाला. कंपन्यांच्या कच्च्या मालाच्या आणि इतर उत्पादक घटकांच्या किमतीतील वाढीचा दर नोव्हेंबर २०२५ नंतरच्या नीचांकी पातळीवर आला. त्यामुळे कंपन्यांवर विक्री दर वाढविण्याचा दबाव कमी होता, असे अहवालाने नमूद केले आहे.

पुढील वर्षाबाबत कंपन्या आशावादी

पुढील १२ महिन्यांबाबत सेवा क्षेत्रातील कंपन्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. मजबूत मागणी आणि ग्राहकांकडून वाढत्या चौकशीमुळे कंपन्यांना आगामी काळातील व्यवसायाबाबत विश्वास आहे. सर्वेक्षणातील १६ टक्क्यांपेक्षा थोड्या कमी कंपन्यांनी पुढील वर्षभरात उत्पादन किंवा व्यवसायवाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली. उर्वरित कंपन्यांनी सध्याच्या पातळीवर व्यवसाय कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला. दरम्यान, उत्पादन आणि सेवा क्षेत्राचा एकत्रित आढावा घेणारा ‘एचएसबीसी इंडिया कम्पोझिट पीएमआय आउटपुट इंडेक्स’ ऑगस्टमधील ५४.३ वरून सप्टेंबरमध्ये ५५.९ वर पोहोचला. जूननंतर खासगी क्षेत्रातील उत्पादनातील ही सर्वाधिक वाढ ठरली.

मजबूत होत असलेल्या देशांतर्गत मागणीमुळे भारतीय सेवाक्षेत्रातील सुधारणा कायम राहिली आहे. निर्यात व्यवसायातही वाढ सुरू आहे; मात्र या वाढीचा वेग काहीसा मंदावला आहे. -प्रांजुल भंडारी, अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी