भुवनेश्वर : जागतिक अनिश्चिततेमुळे व्यापाराबाबत चिंता व्यक्त होत असताना, जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष अजय बंगा यांनी भारताने शुल्काच्या जाचाबद्दल चिंता सोडून, उपलब्ध संधींवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला गुरुवारी दिला.

मुक्त व्यापार करारांमुळे उपलब्ध होणार्‍या संधींबद्दल अधिक विस्ताराने बोलताना बंगा म्हणाले की, गेल्या २० वर्षांत भारताने १०० हून अधिक प्रादेशिक आणि द्विपक्षीय करार केले आहेत आणि ताजा भारत-युरोपीय महासंघादरम्यानचा मुक्त व्यापार करार हे या प्रयासांचेच एक फळ आहे. या सारख्या संधींवर देशाने लक्ष द्यावे, असे ते म्हणाले. भुवनेश्वरमधील डेन्मार्क सरकारच्या सहयोगाने उभारण्यात आलेल्या ‘सेंट्रल टूल रूम अँड ट्रेनिंग सेंटर’च्या दौर्‍यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना बंगा यांनी सर्व व्यापार करार महत्त्वाचेच आहेत, अशी टिप्पणी केली. गेल्या दोन दशकांत जागतिक व्यापार चौपट झाला आहे, तर उदयोन्मुख बाजारपेठांचा वाटा २० टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत दुप्पट झाला आहे. त्यामुळे, भारतासारख्या उभरत्या बाजारपेठा आता जागतिक व्यापारात महत्त्वाचे घटक बनल्या आहेत, असे ते म्हणाले.