Indian Army salary Tax : देशहितासाठी अहोरात्र सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय लष्करातील जवानांना काही विशेष सवलती दिल्या जातात. यात प्राप्तिकर भरतानाही सामान्य नागरिकांपेक्षा जास्तीची सूट जवानांना मिळते. मात्र, लष्करातील जवानांचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असते का? असा प्रश्न अनेकवेळा सामान्य नागरिकांच्या मनात येतो.
लष्करी जवानांचा पगार आणि प्राप्तिकर
भारतीय लष्करातील जवानांना मिळणारा पगार पूर्णपणे करमुक्त नसतो. सामान्य नागरिकांप्रमाणेच जवानांनाही त्यांच्या मूळ पगारावर आणि महागाई भत्त्यावर प्राप्तिकर भरावा लागतो. मात्र, त्यांना मिळणारे विविध भत्ते आणि काही विशेष परिस्थितींमध्ये सरकारकडून मोठी करसवलत दिली जाते.
विविध भत्त्यांवरील करसवलत
जवानांना त्यांच्या तैनातीनुसार मिळणाऱ्या भत्त्यांवर विशेष सवलत मिळते. यात जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीनमध्ये तैनात असलेल्या जवानांना मिळणाऱ्या भत्त्यावर दरमहा ७,००० रुपयांपर्यंत करसवलत मिळते. ९,००० ते १५,००० फूट उंचीवर तैनात असल्यास दरमहा १,०६० रुपये आणि १५,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर असल्यास १,६०० रुपयांपर्यंत सवलत दिली जाते. तणावग्रस्त सीमाभागात तैनात असलेल्या जवानांना सुमारे ३,९०० रुपये आणि अधिकाऱ्यांना ४,२०० रुपयांपर्यंत मासिक करसवलत मिळते. अंदमान सारख्या बेटांवर तैनात सैनिकांना दरमहा ३,२५० रुपयांपर्यंत कर सवलत मिळते.
पूर्णपणे करमुक्त असणारे उत्पन्न
वीरता पुरस्कार : परमवीर चक्र किंवा महावीर चक्र यांसारख्या शौर्य पुरस्कारांनी सन्मानित जवानांची पूर्ण पेन्शन करमुक्त असते.
शहीद कुटुंबाची पेन्शन : देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबांना मिळणारी कौटुंबिक पेन्शन पूर्णपणे करमुक्त असते.
अपंगत्व पेन्शन आणि ग्रॅच्युइटी : सेवेदरम्यान जखमी झाल्यामुळे मिळणारी अपंगत्व पेन्शन आणि निवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅच्युइटी यावर कोणताही कर आकारला जात नाही.
गुंतवणुकीवर आधारित वजावट
सामान्य करदात्यांप्रमाणे जवानही कलम 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतची वजावट क्लेम करू शकतात. यामध्ये लष्कराच्या स्वतःच्या योजना जसे की AFPF (सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी) आणि AGIF (सेना समूह विमा निधी) मधील गुंतवणूक कर वाचवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
प्राप्तिकर भरण्याची डेडलाईन चुकवू नका
सामान्य पगारदार आणि लहान करदात्यांसाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम तारीख आहे. ज्यांच्या खात्यांचे ऑडिट होत नाही, पण ITR-3 किंवा ITR-4 भरतात ते करदाते ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकतात. ज्यांचे उत्पन्न मोठे आहे आणि ज्यांच्यासाठी टॅक्स ऑडिट अनिवार्य आहे, अशा व्यावसायिक आणि कंपन्यांसाठी मुदत जास्त आहे. या वर्गासाठी शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ आहे. जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही वर्गात असून तुमची डेडलाईन चुकली, तर घाबरण्याचे कारण नाही. पण, तुम्हाला त्याचा आर्थिक दंड सोसावा लागेल. उशीरा प्राप्तीकर परतावा भरण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत आहे.
