नवी दिल्ली : विद्यमान २०२६ साल हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी १९९१ सालातील संकटासारखेच असून, हेच वर्ष महत्त्वाचे वळण व कलाटणीचा टप्पाही ठरू शकते, असे प्रतिपादन भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी गुरुवारी केले. देशांतर्गत उत्पादन, ऊर्जा, शेती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतील आव्हानांसोबतच, प्रतिकूल जागतिक स्थितीचा सामना भारत सध्या करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्लीत आयोजित ‘आयएसआयडी-आयडीआरए’ राष्ट्रीय परिषदेत बोलताना नागेश्वरन यांनी जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक चित्राचे विश्लेषण मांडले. १९९१ प्रमाणेच २०२६ हे वर्ष भारताच्या आर्थिक वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, १९९१ सारखे परकीय चलनाचे मोठे संकट आज भारतासमोर नाही. १९९१ मध्ये चार दशकांपासून साचलेल्या समस्यांमुळे सुधारणांचा निर्णय घ्यावा लागला होता, तर आज बाह्य तणाव आणि देशांतर्गत मर्यादांमुळे भारताला आपल्या आर्थिक धोरणाचा नव्याने विचार करावा लागत आहे.

सध्याची संकटे ही नैसर्गिक नसून जागतिक राजकारणातून निर्माण केली जाऊन आपल्यापुढे आली आहेत. याचे उदाहरण देताना नागेश्वरन यांनी सांगितले की, गेल्याच आठवड्यात भारताला मोठी गरज असलेल्या टनेल बोरिंग मशीन आणि इतर पायाभूत सुविधांच्या उत्पादनांच्या निर्यातीवर चीनने परवाना प्रणाली लागू केली आहे. अशा प्रकारे वस्तूंचा पुरवठा रोखून किंवा अटी-शर्ती घालून तो अडवून देशांना कोंडीत पकडले जात आहे.

या सर्व जागतिक गोंधळात आणि आव्हानांच्या काळात भारत हा स्थिर आणि भक्कम अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुढील ३० वर्षांचे आव्हान वेगळे

करोनापूर्व काळातील संकटे ही मुख्यतः ‘मागणी कमी होण्यामुळे’ येत होती. त्यामुळे व्याजदर कमी करणे किंवा सरकारी आर्थिक पॅकेज देणे यांसारख्या उपायांनी ती सोडवता येत होती. मात्र, आगामी २० ते ३० वर्षांत ‘पुरवठा साखळीतील तुटवडा’ हे सर्वात मोठे आव्हान असेल. हे आव्हान केवळ रिझर्व्ह बँक किंवा सरकारच्या आर्थिक धोरणांनी सहजासहजी सोडवता येणारे नाही.