Indian IT sector crisis AI : आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जागतिक तंत्रज्ञान जग वेगाने बदलत असताना, भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध सिलिकॉन व्हॅली गुंतवणूकदार विनोद खोसला यांनी भारताच्या आयटी सेवा उद्योगाच्या भविष्याबाबत एक खळबळजनक विधान केलं आहे. ज्या पारंपरिक कोडिंग, टेस्टिंग आणि आउटसोर्सिंग मॉडेलवर भारताचे अब्जावधी डॉलर्सचे आयटी क्षेत्र उभे राहिले आहे, ते ‘एआय’च्या प्रभावामुळे येत्या काळात पूर्णपणे कोलमडून जाईल, असा इशारा खोसला यांनी दिला आहे.

‘पॉडकास्ट अल्फा’च्या ताज्या एपिसोडमध्ये बोलताना खोसला यांनी हे विधान केलं आहे. ते म्हणाले, “भारताचा आयटी सेवा उद्योग येत्या काळात इतिहासजमा होईल. हे मी अंदाज लावून बोलत नाहीये, तर हे निश्चित आहे.”

३०० अब्ज डॉलरच्या विक्रमी टप्प्यावरच संकट!

भारतीय आयटी उद्योग एका ऐतिहासिक टप्प्यावर असताना विनोद खोसला यांचे हे विधान आले आहे. ‘नॅसकॉम’च्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात भारताचा आयटी उद्योग पहिल्यांदाच ३०० अब्ज डॉलर्सचा महसूल टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. यापैकी केवळ निर्यातीचा वाटा २०० ते २३३ अब्ज डॉलर्स एवढा प्रचंड आहे. देशात आयटी क्षेत्राच्या माध्यमातून तब्बल ६० लाख लोकांना थेट रोजगार मिळतो. या क्षेत्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे.

आयटीचा विकासदर घसरला

आयटी क्षेत्राच्या महसुलाचा आकडा मोठा वाटत असला तरी आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. या क्षेत्राचा विकास दर ५ ते ६ टक्क्यांवर घसरला असून, मोठ्या कंपन्यांमधील नोकरभरती पूर्णपणे मंदावली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये आघाडीच्या आयटी कंपन्यांनी नवीन कर्मचाऱ्यांची केलेली निव्वळ भरती अत्यंत मर्यादित आहे. भारताचे आयटी क्षेत्र प्रामुख्याने कोडिंग, टेस्टिंग, कस्टमर सपोर्ट आणि बॅकएंडसारख्या रोजच्या कामांवर आधारित आहे. मात्र, एआयमुळे ही कामे आता धोक्यात आली असल्याचे खोसला यांचे मत आहे.

पुढील ५ वर्षांत अनेक कामे एआय करणार

पुढील ५ वर्षांत आयटी आणि बीपीओ सेवा पूर्णपणे नाहीशा होऊ शकतात. कारण, कौशल्यावर आधारित कामांमध्ये एआय सिस्टीम माणसांपेक्षा सरस कामगिरी करत आहे, असे भाकीत खोसला यांनी वर्तवले आहे.

आउटसोर्सिंग सोडा, ‘एआय बिल्डिंग’कडे वळा!

हा धोक्याचा इशारा देतानाच खोसला यांनी भारतासाठी एक आशेचा किरणही दाखवला आहे. भारताने आता स्वतःची भूमिका बदलण्याची गरज आहे, भारताकडे असलेली सर्वात मोठी ताकद म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील गुणवत्ता. मात्र, या टॅलेंटने आता जुन्या आउटसोर्सिंगच्या कामात अडकून न पडता, मोठ्या प्रमाणावर एआय सिस्टीम्स तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे याकडे वळायला हवे. आरोग्य सेवा, शिक्षण, शेती आणि सार्वजनिक सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या लोकसंख्येसाठी एआय टूल्स विकसित केल्यास भारत जगासाठी एक नवीन प्रकारची ‘निर्यात बाजारपेठ’ उभी करू शकतो, असा सल्ला खोसला यांनी दिला.

OpenAI मधील गुंतवणूक आणि खोसला यांचा अचूक अंदाज

विनोद खोसला यांनी २०१८-१९ मध्ये चॅटजीपीटी बनवणारी कंपनी ‘ओपनएआय’मध्ये सुमारे ५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली होती. जेव्हा त्या कंपनीचे कोणतेही प्रॉडक्ट किंवा उत्पन्नाचे मॉडेल तयार नव्हते. त्यावेळी त्यांच्या स्वतःच्या कंपनीने गुंतवणूकदारांना सांगितले होते की, या निर्णयाला कोणतेही लॉजिक नाही. मात्र, आज परिस्थितीत वेगळी आहे. ओपन एआय लवकरच आपला आयपीओ आणण्याची शक्यता आहे.

ओपनएआयची कमाल

आज एआयच्या शर्यतीत ओपनएआय कंपनी आघाडीवर आहे. जानेवारी २०२६ पर्यंत ओपनएआयचा वार्षिक महसूल तब्बल २० अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. या यशाचे उदाहरण देत खोसला म्हणाले, “तांत्रिक क्रांतीच्या काळात जुने अंदाज कसे चुकतात, हे यावरून दिसते. जानेवारी २०२३ मध्ये ज्या कंपनीची कमाई शून्य होती, ती २०२६ मध्ये २० अब्ज डॉलर्स कमावेल, असे मी सांगितले असते तर लोकांनी मला वेड्यात काढले असते. त्यामुळे कधीकधी अंदाज बांधण्यापेक्षा हे मान्य केलेले बरे की तुम्ही भविष्याचा अचूक अंदाज लावू शकत नाही.”