मुंबईः माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीच्या जोरदार माऱ्यामुळे भांडवली बाजार मंगळवारी कोसळला. प्रगत एआय टुल्सच्या परिणामांबाबत धाकधुकीमुळे या क्षेत्रासाठी एप्रिल २००३ नंतरचा म्हणजेच मागील २३ वर्षातील यंदाचा फेब्रुवारी हा सर्वात वाईट महिना ठरण्याची शक्यता आहे.
अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्कासंबंधी धोरणाबाबत वाढलेल्या अनिश्चिततेने जागतिक बाजारात उमटलेल्या नकारात्मक प्रतिक्रियेचे अनुकरण करत खुल्या झालेल्या स्थानिक बाजारात, सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांना तब्बल सव्वा टक्क्यांचे मोठे नुकसान मंगळवारी सोसावे लागले. दिवसभरात १,३६० अंशांच्या घसरणीतून ८२ हजारांची पातळी सोडलेला सेन्सेक्स, दिवसाचे व्यवहार थंडावताना १,०६८.७४ अंशांची (१.२८ टक्के) तूट सोसत, ८२,२२५.९२ वर स्थिरावला. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक २८८.३५ अंशांच्या घसरणीतून २५,४२४.६५ वर बंद झाला.
बाजारातील पडझडीस कारण ठरलेले आयटी शेअर्स ४.७ टक्क्यांहून अधिक घसरून ३० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. अग्रस्थानी असलेल्या टीसीएस, इन्फोसिस, एचसीएलटेक आणि विप्रो यांना २.७ टक्के ते ६.१ टक्क्यांचे नुकसान झाले. फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत आयटी-निर्देशांक २१ टक्क्यांनी घसरला आहे. या निर्देशांकात सामील प्रमुख १० आयटी कंपन्यांचे या काळात एकूण ६.१७ लाख कोटी रुपयांचे (६८.५ अब्ज डॉलर) बाजार मूल्य लयाला गेले आहे. भारतीय बाजाराच्या अगदी उलट परिस्थिती दक्षिण कोरिया आणि तैवान या आशियाई बाजारांची राहिली. एआय-संलग्न शेअर्समुळे मंगळवारी या बाजारांनी विक्रमी उच्चांक गाठला.
अँथ्रोपिक ही कंपनी आणि तिचे ‘क्लॉड’ हे एआय मॉडेल सध्याच्या जागतिक पडझडीच्या केंद्रस्थानी आहे. हे मॉडेल कोडिंगमध्ये अत्यंत अचूक मानले जाते. भारतीय आयटी कंपन्यांचा मुख्य व्यवसाय सॉफ्टवेअर विकसन आणि देखभाल हेच आहे. अँथ्रोपिकमुळे हे काम कमी वेळेत आणि कमी मनुष्यबळात केले जाईल. पारंपारिक सॉफ्टवेअर व्यवसाय प्रारूपांचा वापर यातून निरर्थक ठरेल. यातून मुख्यत्वे भारताच्या कंपन्यांच्या महसुलावर गदा येण्याची भीती आहे, हे लक्षात आल्याने गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीची भावना आहे. ‘नॅसकॉम’च्या मते, पुढील आर्थिक वर्षात आयटी उद्योगाचा महसूल सुमारे ३१५ अब्ज डॉलरने घसरण्याची शक्यता आहे.
गुंतवणूक धोरण बदलण्याचा सल्ला
एआयच्या धक्क्यामुळे गडगलेले माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांचे समभाग लवकरच सावरण्याची शक्यता नाही. भारतीय आयटी कंपन्यांना आणखी संघर्ष करावा लागणार आहे. आयटीमधून इतर चांगली कामगिरी करणाऱ्या क्षेत्रांकडे निधी वळवल्यास गुंतवणूकदारांना फायदा होईल, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे गुंतवणूक रणनीतीकार, डॉ. व्ही.के. विजयकुमार यांनी व्यक्त केले. आयटी क्षेत्रासंबंधाने जोखीम भावना विपरित बनली असल्याचे ते म्हणाले.
‘सार्स’ उद्रेकाने निर्माण केलेल्या घबराटीची पुनरावृत्ती
फेब्रुवारी महिन्यांतील आगामी उर्वरित तीन सत्रांमध्ये आयटीतील घसरणीची मालिका कायम राहिली, तर ‘निफ्टी आयटी निर्देशांका’ची २३ वर्षांतील ही सर्वात वाईट मासिक कामगिरी ठरेल. एप्रिल २००३ मध्ये अमेरिका-इराक युद्ध, इन्फोसिसची वाईट तिमाही कामगिरी आणि आग्नेय आशियातील सार्स विषाणूच्या उद्रेकामुळे शेअर बाजारात घबराट पसरून, त्यातून आयटी क्षेत्राला जबर नुकसान सोसावे लागले होते.
