पीटीआय, नवी दिल्ली
नवीन कार्यादेशातील जलद वाढीमुळे देशातील निर्मिती क्षेत्र जानेवारी महिन्यात सावरल्याचे सरकारी मासिक सर्वेक्षणातून सोमवारी समोर आले. निर्मिती क्षेत्राने डिसेंबर महिन्यात दोन वर्षांतील नीचांकी पातळी गाठली होती.

देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या एचएसबीसी इंडियाद्वारे निर्मिती क्षेत्रातील खऱेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या सर्वेक्षणावर आधारित (पीएमआय) निर्देशांक जानेवारी महिन्यात ५५.४ गुणांवर नोंदविण्यात आला. त्याआधीच्या महिन्यात (डिसेंबर २०२५) निर्देशांक ५५ गुणांवर नोंदविला गेला होता. या निर्देशांकाची ही दोन वर्षांतील नीचांकी पातळी ठरली होती. निर्देशांक ५० गुणांवर असल्यास विस्तापूरकता तर ५० गुणांखाली असल्यास आकुंचन दर्शवतो.

सर्वेक्षणातील सहभागींना कार्यादेशात झालेली वाढ, नवीन व्यवसायातील वाढ आणि उत्पादनाला तंत्रज्ञान गुंतवणूकधारित पाठबळ या बाबींकडे लक्ष वेधले आहे. जानेवारी महिन्यात देशांतर्गत विक्रीत वाढ झाली आहे. नवीन निर्यात व्यवसायातही सुधारणा होत असली तरी त्याचा वेग तुलनेने कमी आहे. आशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युरोप आणि आखाती देशांतून नवीन कार्यादेशात प्रामुख्याने वाढ दिसून आली आहे. रोजगार निर्मितीच्या पातळीवर चांगली स्थिती दिसून आली आहे. रोजगार निर्मितीचा दर तीन महिन्यांतील सर्वाधिक चांगला नोंदविण्यात आला आहे.

व्यवसाय आत्मविश्वासात घसरण

निर्मिती क्षेत्रातील व्यवसाय आत्मविश्वासात घसरण झाल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. हा आत्मविश्वास साडेतीन वर्षांतील नीचांकी पातळीवर आला आहे. सर्वेक्षणात सहभागी कंपन्यांपैकी केवळ १५ टक्के कंपन्यांनी आगामी काळात उत्पादनात वाढीचा अंदाज वर्तविला आहे. याच वेळी ८३ टक्के कंपन्यांनी उत्पादनातील वाढ स्थिर राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

देशातील निर्मिती क्षेत्राने डिसेंबरमधील नीचांकी पातळीवरून जानेवारीत सकारात्मक कामगिरी केली आहे. नवीन कार्यादेश आणि रोजगार निर्मितीत वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली असली तरी उत्पादनांच्या किमतीतील वाढीचा दर कमी झाला आहे. यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर किंचित दबाव निर्माण झाला आहे. – प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी