मुंबई : अमेरिकेचे नवीन विस्तारवादी धोरण आणि त्या परिणामी वाढत्या भू-राजकीय तणावामुळे मंगळवारी शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १०६६ अंशांनी कोसळून ८२ हजारांखाली गडगडला. दांडग्या डॉलरपुढे रुपयामधील कमजोरी आणि परदेशी निधीच्या देशाबाहेर धडाक्याने सुरू असलेल्या पलायनाने बाजाराच्या भीतीयुक्त निराशेत आणखीच भर घातली.

सलग दुसऱ्या सत्रातील घसरणीत, मंगळवारी सेन्सेक्सने आणखी १,०६५.७१ अंशांचे नुकसान सोसले. सत्रादरम्यान त्याची गटांगळी १,२३६ अंशांपर्यंत वाढली होती. मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध ३,५०३ कंपन्यांचे समभाग घसरले, तर वाढलेल्या कंपन्यांची संख्या केवळ ७८० होती. निफ्टी निर्देशांकदेखील ३५३ अंशांनी, म्हणजेच १.३८ टक्क्यांनी घसरून २५,२३२.५० पातळीवर बंद झाला. ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणाने जागतिक बाजारात सर्वत्रच पडझडीची स्थिती निर्माण केली असून, गुंतवणूकदारांच्या जोखीम घेण्याच्या कमी झालेल्या प्रवृत्तीने शेअर बाजारांचा नकारात्मक कल कायम राहिला आहे. तर या उलट सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय असलेल्या सोने आणि चांदीच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.

ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या युरोपीय राष्ट्रांवर अतिरिक्त शुल्क लादण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या धमक्यांमुळे जागतिक शेअर बाजारात पुन्हा एकदा विक्रीचा जोर वाढला आहे, आणि भारतीय बाजारांवरही व्यापक दबाव दिसून येत आहे, असे निरीक्षण एनरिच मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोनमुडी आर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये सामील आघाडीच्या कंपन्यांपैकी, इटर्नलचा समभाग ४.०२ टक्क्यांनी घसरला, त्यापाठोपाठ बजाज फायनान्स (३.८८ टक्के), सन फार्मा, इंटरग्लोब एव्हिएशन, ट्रेंट, एशियन पेंट्स, महिंद्र अँड महिंद्र आणि बजाज फिनसर्व्ह यांनी बाजाराची निराशा केली. तर यामध्ये एकमेव एचडीएफसी बँक सकारात्मक पातळीवर बंद झाली.

घसरणीची ठळक कारणे…

● ग्रीनलँडवरून अमेरिका-युरोप यांच्यातील वाढता संघर्ष, व्यापार युद्धाची भीती

● सोने-चांदी यासारख्या सुरक्षित मालमत्तांकडे पैशांचा ओघ

● कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे अपेक्षेपेक्षा वाईट निकाल

● परकीय गुंतवणूकदारांचा विक्रीचा झपाटा आणि माघार

● अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूकदारांची सावध बनलेली भूमिका

● दांडग्या डॉलरपुढे रुपयाची नांगी

९.८६ लाख कोटींची झळ

बाजारातील विक्रीच्या मंगळवारी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ९.८६ लाख कोटी रुपयांची घट झाली. भांडवली बाजारातील मंदीच्या प्रवाहाचे प्रतिबिंब म्हणजे, मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ९.८६ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ४५५.८२ कोटी रुपयांपर्यंत (५.०१ ट्रिलियन डॉलर) खाली आले.

चांदीत एका दिवसात २२ हजारांची वाढ

जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदी दरात सातत्याने वाढ होत असून मंगळवारी दोन्ही धातूंनी पुन्हा उच्चांक केला. सोने दीड लाखांवर गेले, तर एकाच दिवसात २२ हजार ६६० रुपयांची वाढ झाल्याने चांदी ३.३० लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५२ हजार ८५२ रुपयांचा नवीन उच्चांक केला. चांदी तीन लाख २९ हजार ६०० रुपयांवर पोहोचली. चांदीच्या दरातही नवीन वर्षात आतापर्यंत ८७ हजार रुपयांची वाढ झाली.