Indian origin global economists education and career contributions overview: भारतीय वंशाच्या अर्थतज्ज्ञांनी जागतिक आधुनिक आर्थिक विचार आणि धोरणे घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विकास अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय व्यापारापासून ते वर्तनविषयक अर्थशास्त्र आणि वित्तीय नियम बनवण्यापर्यंतच्या विविध क्षेत्रांवर त्यांनी आपली छाप सोडली आहे. यातील अनेकांचा शैक्षणिक प्रवास भारतात सुरू होऊन अमेरिकेतील जगप्रसिद्ध विद्यापीठांपर्यंत विस्तारलेला आहे. ज्यातून त्यांच्या समृद्ध सांस्कृतिक आणि कठोर शैक्षणिक पार्श्वभूमीचा सुरेख संगम दिसून येतो.

रघुराम राजन (जन्म ३ फेब्रुवारी १९६३)

रघुराम राजन यांनी आयआयटी दिल्लीतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. आणि आयआयएम अहमदाबादमधून एमबीए पदवी मिळवली आहे. तसेच १९९१ मध्ये एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून काम केले. याचबरोबर २०१३ ते २०१६ ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे २३ वे गव्हर्नर होते.

सध्या ते शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्रोफेसर ऑफ फायनान्स या पदावर कार्यरत आहेत. २००८ च्या आर्थिक संकटाबाबत त्यांनी दिलेले इशारे आणि बँकिंग रचना व आर्थिक विकासाबाबतचे त्यांचे सखोल विश्लेषण यामुळे जागतिक वित्तक्षेत्रात त्यांना एक प्रतिष्ठित स्थान प्राप्त झाले आहे.

अभिजीत बॅनर्जी (जन्म २१ फेब्रुवारी १९६१)

अभिजीत बॅनर्जी यांनी १९८१ मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात बी.एस्सी. पदवी मिळवली आणि त्यानंतर १९८३ मध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एम.ए. पूर्ण केले. पुढे १९८८ मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पीएचडी मिळवली.

बॅनर्जी सध्या एमआयटीमध्ये फोर्ड फाउंडेशन आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र प्राध्यापक आणि जे-पाल (अब्दुल लतीफ जमील पॉव्हर्टी ॲक्शन लॅब) चे सह-संस्थापक आहेत. एस्थर डुफ्लो आणि मायकेल क्रेमर यांच्यासोबत, गरिबी कमी करण्यासाठी यादृच्छिक नियंत्रित चाचण्यांच्या नाविन्यपूर्ण वापरासाठी त्यांना २०१९ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांच्या कार्यामुळे जागतिक स्तरावर विकास कार्यक्रम कसे तयार केले जातात याला नवी दिशा मिळाली आणि धोरणांना सखोल क्षेत्रीय संशोधनाचा आधार मिळाला.

गीता गोपीनाथ (जन्म ८ डिसेंबर १९७१)

गीता गोपीनाथ यांनी १९९२ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमनमधून कला शाखेची पदवी मिळवसी आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हैसूरच्या निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. पुढे २००१ मध्ये त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून इंटरनॅशनल मॅक्रोइकॉनॉमिक्स आणि बिझनेस या विषयात पीएच.डी. केली.

व्यावसायिक कारकीर्दीत गोपीनाथ यांनी प्रतिष्ठित शैक्षणिक आणि धोरणात्मक पदे भूषवली आहेत. यामध्ये हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापकपद आणि २०१९ ते २०२२ या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून बजावलेली भूमिका यांचा समावेश आहे. जानेवारी २०२२ मध्ये त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या उप-व्यवस्थापकीय संचालक बनल्या. त्यांचे संशोधन प्रामुख्याने सार्वभौम कर्ज, व्याजदरातील चढ-उतार आणि आंतरराष्ट्रीय स्थूल अर्थशास्त्र या विषयांवर केंद्रित आहे. २०१४ मध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ४५ वर्षांखालील २५ प्रमुख अर्थतज्ज्ञांमध्ये निवड करण्यात आली होती.