Indian Railways Travel Insurance 45 Paise Scheme Details: देशातील रेल्वे प्रवाशांबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रेल्वे विभागाने केवळ ४५ पैशांत प्रवाशांसाठी १० लाख रुपयांपर्यंतच्या विमा संरक्षण सुविधेची सुरुवात केली आहे. याआधी केवळ ऑनलाइन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच उपलब्ध असलेली ही सुविधा आता रेल्वे काउंटरवरून आरक्षित तिकीट काढणाऱ्या पात्र प्रवाशांनाही मिळणार आहे.

जे प्रवासी आजही रेल्वे स्थानकांवर जाऊन तिकीट काढण्याला प्राधान्य देता अशा लाखो प्रवाशांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. आतापर्यंत ही ऐच्छिक प्रवास विमा सुविधा केवळ ऑनलाइन तिकीट बुकिंगपुरती मर्यादित होती. ती आता काउंटरवरून तिकीट काढणाऱ्या पात्र प्रवाशांसाठीही उपलब्ध करून दिल्यामुळे, कमी खर्चात मिळणाऱ्या या सुरक्षा कवचाचा लाभ अधिक प्रवाशी घेऊ शकतील.

काय आहे विमा योजना?

“हा विमा ऐच्छिक आहे. जे प्रवासी हा विमा घेतील त्यांना पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार १० लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळू शकते. रेल्वेचे अपघात किंवा सुरक्षेच्या दृष्टीने इतर घटना घडल्यास, आर्थिक मदत मिळावी हा या विम्याचा उद्देश आहे”, असे ॲक्मे इंडिया इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सूरज पांडे यांनी सांगिल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

४५ पैशांत कसा मिळवायचा १० लाखांचा विमा

या विम्याचा प्रीमियम नाममात्र आहे, परंतु प्रवाशांनी तो घेण्यापूर्वी याच्या अटी आणि शर्ती समजून घेणे महत्त्वाचे आहे.

“रेल्वे काउंटरवर आरक्षित तिकीट बुक करणारे पात्र प्रवासी पर्यायी विमा सुविधेचा लाभ घेऊ शकतात. प्रीमियम ४५ पैसे प्रति प्रवासी इतका आहे आणि याचे कमाल कव्हरेज १० लाख रुपये आहे. बुकिंगच्या वेळी प्रवाशांनी विमा पर्याय आणि लागू अटी तपासल्या पाहिजेत. कव्हर होणाऱ्या घटना, उपलब्ध फायदे आणि दावा करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्यांनी पॉलिसी तपशील देखील वाचले पाहिजे”, असे सूरज पांडे यांनी पुढे सांगितले.

केवळ रेल्वे विमा पुरेसा का नाही?

विमा एखाद्या अपघाताच्या घटनेनंतर आर्थिक आधार देऊ शकतो, परंतु तो अपघात रोखू शकत नाही किंवा प्रवासादरम्यान प्रवाशांसमोर असणारे धोके पूर्णपणे दूर करू शकत नाही. त्यासाठी रेल्वे पायाभूत सुविधा, डब्यांची रचना, साहित्याचा दर्जा आणि देखभाल-दुरुस्ती यामध्ये सातत्याने गुंतवणूक करणे आवश्यक असते.

उदाहरणार्थ, रेल्वे डब्यांच्या आतील भागाचा सतत वापर होत असतो, तिथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे झीजही होत असते. याचबरोबर स्वच्छता आणि कार्यक्षमताही तितकीच महत्त्वाची आहेत. जीर्ण झालेली जोडणी, खराब होत चाललेला आतील भाग आणि नीट देखभाल न केलेले घटक यामुळे काही प्रकरणांमध्ये, टाळण्याजोगे धोकेही निर्माण करू शकतात.