मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारच्या सत्रात २ पैशांनी घसरून ९५.२५ या आतापर्यंतच्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर बंद झाला. आखाती देशांमध्ये नव्याने पेटलेला संघर्ष आणि इराणने संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची बळावली आहे. परिणामी गुंतवणूकदार अधिक जोखीम असलेल्या मालमत्तांपासून दूर जात आहेत.

प्रतिपिंप ११० अमेरिकी डॉलरच्या आसपास रेंगाळणाऱ्या ‘ब्रेंट’ तेलाच्या किमतींमुळे भारतासारख्या तेल आयातदार अर्थव्यवस्थांवर दबाव कायम आहे. शिवाय, वाढत्या भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर परकीय भांडवलाचे सुरू असलेले अविरत निर्गमन यांसारख्या घटकांनी गुंतवणूकदारांच्या भावनांना अधिकच धक्का बसला आहे, असे परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले.

रुपयाने मंगळवारच्या सत्रात ९५.३० पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली, त्यानंतर त्यात आणखी घसरण झाली आणि सत्रादरम्यान त्याने ९५.४४ या आतापर्यंतच्या ऐतिहासिक नीचांकी पातळीला स्पर्श केला. अखेरीस, रुपया सत्राच्या समाप्तीवेळी ९५.२५ या नव्या विक्रमी नीचांकी पातळीवर स्थिरावला. सोमवारी, रुपया ३९ पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९५.२३ या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर बंद झाला होता.

जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आणि होर्मुझ सामुद्रधुनी अजूनही बंद असल्याने, रुपयाच्या व्यवहाराचा कल नकारात्मक राहण्याची शक्यता आहे. आयातदारांकडून होणारी डॉलरची मागणी आणि अमेरिका- इराण यांच्यातील सध्याचा भू-राजकीय तणाव यामुळेही रुपयावर दबाव येऊ शकतो. मात्र, रिझर्व्ह बँकेचा हस्तक्षेप रुपयाला खालच्या पातळीवर आधार देण्याची शक्यता आहे. रुपया प्रतिडॉलर ९५.१० ते ९५.५५ या श्रेणीत व्यवहार करेल अशी अपेक्षा आहे. – अनुज चौधरी, संशोधन विश्लेषक, मिरे ॲसेट शेअरखान.