Rupee vs Yuan Exchange : पश्चिम आशियातील तणावामुळे भारत दुहेरी संकटात सापडला आहे. या संकटामुळे भारतीय चलन ‘रुपया’ केवळ अमेरिकी डॉलरच्या तुलनेतच कमकुवत झालेला नाही, तर चीनचे चलन ‘युआन’च्या तुलनेतही कमालीचा घसरला आहे. या थेट फटका देशातील सामान्य जनता आणि उद्योग क्षेत्राला बसत आहे. कारण भारतात चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती वेगाने वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. देशातील उनेक उद्योग चीनमधून येणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून असल्याने भारत ठरवूनही ही आयात थांबवू शकत नाही. परिणामी देशात महागाईचा धोका वाढला आहे, तर दुसरीकडे चीनला मात्र या परिस्थितीचा मोठा आर्थिक लाभ मिळत आहे.
डॉलरच्या तुलनेत ‘युआन’समोर रुपयाची जास्त घसरण
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, ज्याप्रमाणे डॉलरच्या तुलनेत रुपया घसरणे चिंताजनक आहे, अगदी तसेच युआनच्या तुलनेत रुपया कमकुवत होणे भारतासाठी अधिक घातक आहे. कारण भारत चीनकडून अब्जावधी डॉलर्सचा माल आयात करतो. त्या तुलनेत भारताची चीनला होणारी निर्यात नगण्य आहे. जानेवारी २०२६ मध्ये १ चीनी युआनची किंमत सुमारे १२.८ ते १३ रुपये इतकी होती. मात्र, रुपयातील घसरणीमुळे आता १ युआनचा दर थेट १४ ते १४.२ रुपयांवर पोहोचला आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, चीनकडून तोच माल खरेदी करण्यासाठी भारताला आता ८ ते १० टक्के अधिक रुपये मोजावे लागणार आहेत, ज्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत चिनी वस्तू महाग होणार आहेत.
चीनकडून होणारी अवाढव्य आयात
२०२४ मध्ये भारताने चीनकडून १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रुपयांची आयात केली होती. दुसऱ्याच वर्षी २०२५ मध्ये ही आयात तब्बल ११५ ते १२० अब्ज डॉलर्स दरम्यान राहिली. सध्याचा ट्रेंड पाहता, इलेक्ट्रॉनिक्स, सौर ऊर्जा उपकरणे आणि यंत्रसामग्रीची आयात वेगाने वाढली आहे. जर हाच वेग कायम राहिला, तर वर्ष २०२६ मध्ये चीनकडून होणारी आयात १२५ ते १३५ अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
देशात या वस्तू महाग होणार
आगामी काळात देशात मोबाईल, लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सौर उर्जा उपकरणे, औद्योगीक यंत्र सामग्री, औषधांचा कच्चा माल, वाहनांचे सुटे भाग, उत्पादन साहित्य, ईव्ही वाहने अशा वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
७५,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा!
एक साधे गणित पाहिले तर, वर्ष २०२५ मधील १२० अब्ज डॉलर्सच्या आयातीवर रुपया युआनच्या तुलनेत ७ टक्के कमकुवत झाल्यामुळे भारताला ८.४ अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त फटका बसला आहे. भारतीय रुपयात रूपांतर केल्यास हा बोजा तब्बल ७०,००० ते ७५,००० कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाच्या घरात जातो.
व्यापार तूट चिंतेची बाब
दोन देशांमधील खरेदी आणि विक्री मधील फरकाला व्यापार तूट म्हणतात. वित्तीय वर्ष २०२५ मध्ये भारताने चीनला केवळ १४.५ अब्ज डॉलर्सची निर्यात केली, ज्यामध्ये प्रामुख्याने पेट्रोलियम उत्पादने, लोखंड, इलेक्ट्रॉनिक्स आणि आवश्यक घटकांचा समावेश होता. त्या तुलनेत भारताने चीनमधून ११५ अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची खरेदी केली. त्यामुळे दोन्ही देशातील व्यापारी तूट अवाढव्य आहे.
रुपया नेमका का घसरत आहे?
चीनकडून होणारी अवाढव्य आयात आणि कमी निर्यात हे रुपया घसरण्याचे सर्वात मुख्य कारण आहे. जागतिक बाजारात डॉलर मजबूत झाला असून डॉलरने नुकताच ९६.८ चा नीचांकी स्तर गाठला आहे. याउलट, चिनी चलन युआन डॉलरच्या तुलनेत चालू वर्षात २ ते ३ टक्क्यांनी मजबूत झाले आहे. इराण आणि अमेरिका वाद आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाने प्रति बॅरल १०० डॉलरची किंमत पार केली आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून यावर्षी तब्बल २.२ लाख कोटी रुपयांचा निधी काढून घेतला आहे, या चौफेर संकटाने रुपया नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
