भारत-अमेरिका व्यापार करारामुळे मंगळवारी रुपया १२२ पैशांनी वधारून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ९०.२७ पातळीवर बंद झाला आणि दिवसांतील ते सर्वोत्तम कामगिरी करणारे आशियाई चलन ठरले. एकाच सत्रात चलनातील जवळपास दीड टक्क्यांची ही सात वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये नोंदविल्या गेलेल्या वाढीनंतरची सर्वोत्तम झेप आहे.

व्यापार करारामुळे रुपया अडीच आठवड्यांतील उच्चांकावर पोहोचला आणि त्यात सुमारे १.५ टक्क्यांची वाढ झाली, असे परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले. सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकांतही दमदार वाढ झाली. ज्यामुळे देशांतर्गत बाजारातील भावनांना चालना मिळाली. याशिवाय, खनिज तेलाच्या किमतींमधील नरमाई आणि अपेक्षित परकीय गुंतवणुकीमुळेही एकंदर बाजारात उत्साह होता.

परकीय चलन बाजारात, डॉलरच्या तुलनेत रुपयाने ९०.३० पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली, त्यानंतर त्याने ९०.०५ हा सत्रातील उच्चांक आणि ९०.५२ हा नीचांक गाठला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच सोमवारी रुपया ४४ पैशांनी वधारून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ९१.४९ वर बंद झाला होता.

रुपयाच्या वाढीबाबत ऐतिहासिक नोंदी

गेल्या १२ वर्षांत एक टक्क्यांहून अधिक वाढ केवळ १० वेळाच झाली आहे. ही ताजी वाढ २०१४ पासूनची तिसरी सर्वात मोठी एका सत्रातील वाढ आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या आकडेवारीनुसार, ऐतिहासिकदृष्ट्या, रुपयाची सर्वात मोठी एका सत्रातील वाढ १८ डिसेंबर २०१८ रोजी नोंदवली गेली होती, जेव्हा त्यात १.६२ टक्क्यांची वाढ झाली होती, त्यानंतर ११ नोव्हेंबर २०२२ रोजी १.५१ टक्क्यांची वाढ झाली. मंगळवारच्या (३ फेब्रुवारी) १.४८ टक्क्यांच्या वाढीने २ नोव्हेंबर २०१८ मध्ये १.४० टक्के आणि २० मे २०१९ मधील १.२९ टक्क्यांच्या उल्लेखनीय वाढीला मागे टाकले आहे.