Rupee vs Dollar Update : सर्वसामान्यांचे बजेट बिघडवणारी बातमी समोर आली आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि भू-राजकीय तणावामुळे भारतीय रुपया पुन्हा एकदा नीचांकी पातळीवर घसरला आहे. सलग काही दिवस मिळालेल्या दिलास्यानंतर, बुधवारी रुपयाने डॉलरच्या तुलनेत ९४.१५ या तीन आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली. याचा परिणाम शेअर बाजारावरही पाहायला मिळाल असून दोन दिवसात सेन्सेक्स १७०० अशांनी घसरला आहे.

कच्च्या तेलाचा ‘भडका’ ठरला कारणीभूत

कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ हे रुपयाच्या घसरणीमागचे मुख्य कारण ठरले आहे. ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल १०३ डॉलर्सच्या पार गेले आहेत. अमेरिकेने इराणच्या जहाजांवर केलेली कारवाई आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढता तणाव यामुळे जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. जगातील एकूण ऊर्जेपैकी २० टक्के व्यापार याच मार्गातून होतो.

डॉलरची मागणी का वाढली?

‘सीआर फॉरेस्ट ॲडव्हायझर्स’चे व्यवस्थापकीय संचालक अमित पाबरी यांच्या मते, जोपर्यंत भू-राजकीय आघाडीवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत रुपयावरील हा दबाव कायम राहील. रुपयाची ९४.०० ते ९४.२० ही पातळी आता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. फिनरेक्स ट्रेझरी ॲडव्हायझर्सचे अनिल कुमार भन्साळी यांनी स्पष्ट केले की, “देशाच्या दैनंदिन तेल गरजा आणि खतांच्या आयातीसाठी तेल कंपन्यांकडून डॉलरची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे. जेव्हा जेव्हा तेलाचे भाव वाढतात, तेव्हा डॉलरची मागणी वाढते आणि रुपयाचे मूल्य कमी होते.”

डॉलरने घेतली सोन्याची जागा?

जागतिक अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याप्रमाणेच डॉलरला ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून प्राधान्य देत आहेत. यामुळे डॉलर इंडेक्स ९८.०० च्या वर स्थिरावला आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे केवळ रुपयाच नाही, तर इतर विकसनशिल अर्थव्यवस्थांच्या चलनांवरही परिणाम झाला आहे.

आरबीआय हस्तक्षेप करणार?

यापूर्वी ३० मार्च रोजी रुपयाने विक्रमी नीचांकी पातळी गाठली होती, त्यानंतर रिझर्व्ह बँकेने ‘रुपी डेरिव्हेटिव्ह’ ट्रेडिंगवर काही निर्बंध लादले होते. आता पुन्हा रुपया ९४ च्या पार गेल्यामुळे, आरबीआय डॉलरची विक्री करून रुपयाला आधार देण्यासाठी बाजारात हस्तक्षेप करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

रुपयाची घसरण आणि डॉलरची मजबुती याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसतो. भारत आपल्या गरजेच्या ८० टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करतो, ज्याचे पेमेंट डॉलरमध्ये करावे लागते. रुपया कमकुवत झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढून वाहतूक खर्च महागणार आहे. याचा थेट परिणाम भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होतो. तसेच, परदेशातून आयात होणारे मोबाईल, लॅपटॉप यांसारखी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि खाद्यतेलाचे दरही वाढू शकतात.