मुंबई: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे भारताची अर्थव्यवस्था आणि रुपयावरील मोठा ताण स्पष्टपणे दिसत असून, सरलेल्या एप्रिल महिन्यात तब्बल ४ टक्क्यांनी घसरलेला रुपया, सोमवारी आणखी ०.२ टक्क्यांनी गडगडून ९५.२३ या नवीन सार्वकालिक नीचांकी पातळीवर ढासळताना दिसला. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि पश्चिम आशियातील तणाव स्थितीचा भारतीय रुपयाला मोठा फटका बसला. परिणामी सोमवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया २४ पैशांनी घसरून ९५.०८ या आजवरच्या सर्वात नीचांकी पातळीवर बंद झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात ‘ब्रेंट क्रूड’ तेल प्रति पिंप ११० डॉलरच्या जवळ पोहोचले आहे. बरोबरीने भविष्यातील डॉलरच्या दरावरील अर्थात ‘नॉन-डिलिव्हरेबल फॉरवर्ड’ सौद्यांमुळे वाढलेल्या डॉलरच्या मागणीचा चलन बाजारात रुपयाच्या मूल्यावर विपरित परिणाम दिसून आला. वाढत्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळे परकीय गुंतवणूकदार काढता पाय घेत असून, भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत. याचाही रुपयावर ताण येत आहे.

आंतरबँक चलन विनिमय बाजारात, सोमवारी रुपयाने प्रति डॉलर ९४.९५ स्तरावर व्यवहार सुरू केले. पुढे ३९ पैशांनी गडगडून डॉलरमागे रुपया ९५.२३ या नव्या नीचांकाकडे झुकला. बाजार बंद होताना तो काहीसा सावरून २४ पैसे (०.२ टक्के) घसरणीसह ९५.०८ या नव्या सार्वकालिक बंद स्तरावर स्थिरावला.

रुपयाला ऐतिहासिक घसरणीपासून वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ‘फॉरवर्ड मार्केट’मध्ये तब्बल १०,४०० कोटी डॉलर (सुमारे ८.६ लाख कोटी रुपये) खर्च करून डॉलरच्या विरोधात मोठी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे व्यापारी बँकांच्या सट्टा व्यवहारांना पायबंद म्हणून त्यांना डॉलरचा साठा करून ठेवण्यावरही रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू केले. आर्बिट्राज व्यवहारांवरही निर्बंध आणले. तथापि रुपयाच्या मूल्यात तात्पुरती दिसून आलेली सुधारणा या पलिकडे ही पावले आता पूर्णपणे निष्फळ ठरल्याचे दिसत आहे.

डॉलरमागे ९६ ची वेसही शक्य

सोमवारी व्यवहारादरम्यान रुपया प्रति डॉलर ९५.२३ पर्यंत घसरला होता. याआधी ३० मार्च रोजी स्थापित ९५.२१ या सत्रांतर्गत ऐतिहासिक नीचांकालाही त्याने मागे टाकले. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक दिलीप परमार यांच्या मते, खनिज तेलाच्या किमतीतील वाढ आणि परकीय निधीचा बाहेर जाणारा ओघ भारताच्या व्यापारी संतुलनावर ताण आणत आहे. चलनासाठी प्रतिकूल या घटकामुळे, येणाऱ्या काळात रुपया ९५.३५ ते ९५.७० पर्यंत खाली जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

रिझर्व्ह बँकेची आक्रमक खेळी

मध्यवर्ती बँक केवळ रोख बाजारातच नाही, तर ‘फॉरवर्ड’ आणि ‘नॉन-डिलिव्हरेबल मार्केट’ अशा वायदे बाजारातही डॉलर विकून रुपयाला सावरण्याचा ती प्रयत्न करत आहे. मार्च महिन्यात रिझर्व्ह बँकेने डॉलर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात (फॉरवर्ड खात्यावर) २,६५० कोटी डॉलरची भर टाकली आणि ते आता १०,४०० कोटी डॉलरच्या पार गेले आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये हा आकडा ८,८७० कोटी डॉलर पातळीवर होता. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात वायदे (फॉरवर्ड) व्यवहार करणे भविष्यात रुपयासाठी आव्हानात्मक ठरू शकते, असा विश्लेषकांचा इशारा आहे.