Indian Rupee Hits Record Low : भारतीय अर्थव्यवस्था सध्या सर्वात वाईट काळातून जात आहे. जागतिक बाजारातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे भारतीय रुपया वारंवार गटांगळ्या खात आहे. आता रुपयाने डॉलरच्या तुलनेत ९५.६२ ही ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली आहे. रुपयाची ही घसरण अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरत असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
रुपयाची ऐतिहासिक घसरण आणि आरबीआयचा हस्तक्षेप
सोमवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९५.६२ या विक्रमी नीचांकी स्तरावर घसरला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने बाजारात हस्तक्षेप केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर रुपया ९५.५० च्या पातळीवर स्थिरावला. या वर्षाच्या सुरुवातीपासून रुपयाच्या मूल्यात ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली असून, आशियातील सर्वात अस्थिर चलनांपैकी एक म्हणून रुपयाची नोंद होत आहे.
रुपया घसरण्याची प्रमुख कारणे
अमेरिका-इराण तणाव
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम ‘लाईफ सपोर्ट’वर असल्याचे विधान केल्याने युद्ध भडकण्याची भीती वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे, जगातील २० टक्के ऊर्जा पुरवठा ज्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो, तो मार्ग सध्या जवळपास बंद आहे. भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे या पुरवठा साखळीतील अडथळ्याचा रुपयावर मोठा दबाव येत आहे.
कच्च्या तेलाचा भडका
जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल १०५ डॉलरच्या जवळ पोहोचले आहेत. भारत हा खनिज तेलाचा मोठा आयातदार असल्याने, वाढत्या किमतींमुळे भारताचे आयात बिल वाढत आहे.
परदेशी गुंतवणूकदारांची पाठ
परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत २ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एआय क्षेत्रातील क्रांतीमुळे गुंतवणूकदार आता दक्षिण कोरिया आणि तैवानसारख्या बाजारपेठांकडे वळाल्याने भारताच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे.
पंतप्रधानांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधनबचत आणि एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. या विधानानंतर गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.
रुपया आणखी घसरणार?
चलन बाजारातील तज्ज्ञांच्या मते, रुपयासाठी आता ९६ ही पातळी मानसिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. रुपया १०० च्या पार जाण्याची शक्यता कमी असली तरी पूर्णपणे नाकारता येत नाही. तांत्रिकदृष्ट्या, रुपयाने ९५.५० ची पातळी ओलांडली, तर रुपया आणखी ५० पैशांनी घसरू शकतो.
सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडणार?
- रुपया कमकुवत झाल्यामुळे तेल आयातीसाठी देशाला जास्त डॉलर्स मोजावे लागतात. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. इंधन महागले की मालवाहतुकीचा खर्च वाढतो, ज्याचा परिणाम भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर होतो.
- जर तुमची मुले परदेशात शिक्षण घेत असतील, तर आता तुम्हाला त्यांच्या फीसाठी आणि राहण्याच्या खर्चासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील.
- मोबाईल फोन्स, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे सुटे भाग मोठ्या प्रमाणावर आयात केले जातात. रुपयाच्या घसरणीमुळे या आयातीचा खर्च वाढतो, परिणामी नामांकित कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवू शकतात.
- रुपयाची घसरण रोखण्यासाठी आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक व्याजदरात वाढ करू शकते. जर व्याजदर वाढले, तर तुमचे गृहकर्ज, कार लोन किंवा पर्सनल लोनचा हप्ता वाढू शकतो.
