Rupee Affected By Crude Oil Iran War: इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने उच्च पातळीवर राहिल्याने जागतिक रोखे उत्पन्नात (Bond Yields) मोठी वाढ झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची तयारी मंदावली आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार असलेल्या भारतासमोरील आर्थिक आव्हानांची तीव्रता अधिकच वाढली आहे. परिणामी, सोमवारी भारतीय रुपयाने आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी गाठली आहे.
आज रुपयामध्ये जवळपास ०.३ टक्क्यांची घसरण होऊन त्याचा विनिमय दर प्रति डॉलर ९६.२२ वर पोहोचला आहे. यासह रुपयाने आपली यापूर्वीची ९६.१३ ही आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळीही ओलांडली आहे. २०२६ मध्ये आशिया खंडात सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या या चलनाने (रुपया) सलग पाच सत्रांमध्ये विक्रमी नीचांकी पातळी गाठली आहे.
इराण युद्ध सुरू झाल्यापासून डॉलरच्या तुलनेत रुपयांत ५.५ टक्क्यांची घसरण झाली आहे.
चलन बाजारातील ट्रेडर्सच्या मते, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) संभाव्यपणे केलेल्या डॉलर-विक्रीच्या हस्तक्षेपामुळेच, रुपयाचे नुकसान अधिक तीव्र झाले नाही. केवळ बाजारातील हस्तक्षेपांपुरतेच मर्यादित न राहता, केंद्र सरकारने रुपयाला आधार देण्यासाठी काही विशेष नियामक निर्बंधही लागू केले आहेत. ज्यामध्ये चांदीच्या बहुतांश आयातीवर लादलेल्या निर्बंधांचा समावेश आहे.
“कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळापर्यंत उच्च पातळीवर राहण्याची शक्यता लक्षात घेता, आम्ही रुपयाच्या पुढील अवमूल्यनाबाबतचा आमचा अंदाज बदलला आहे. त्यानुसार, २०२६ च्या मध्यापर्यंत रुपया ९६/डॉलर आणि २०२६ च्या अखेरीस ९८/डॉलर या पातळीवर पोहोचेल,” असे BofA Global Research च्या विश्लेषकांनी एका टिप्पणीत नमूद केले आहे. याबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
आर्थिक वाढीशी संबंधित धोक्यांमुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीचा ओघ पुन्हा वाढण्याच्या शक्यता धूसर झाल्या आहेत. तर दुसरीकडे, वाढत्या राजकोषीय तुटीबाबतची चिंता आणि व्याजदर वाढीमुळे कर्ज बाजारातील (Debt) गुंतवणुकीच्या संधी मर्यादित होण्याची शक्यता आहे.
रुपयाच्या अवमूल्यनाचे गंभीर परिणाम
वाढणारा आयात खर्च: रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे वस्तूंची आयात करणे महाग होते. उदाहरणार्थ, जर कच्च्या तेलाची किंमत १ डॉलर असेल आणि रुपयाचे अवमूल्यन होऊन तो प्रति डॉलर ५० रुपयांवरून ९६ रुपयांपर्यंत घसरला, तर भारताला त्याच तेलासाठी जास्त रुपये मोजावे लागतात.
महागाई: आयातीचा, विशेषतः कच्च्या तेलाचा वाढलेला खर्च, वाहतूक खर्चावर थेट परिणाम करतो. वाहतूक खर्चातील ही वाढ देशांतर्गत विविध वस्तू आणि सेवांमधील महागाईला हातभार लावते.
दुष्ट आर्थिक चक्र: अवमूल्यनामुळे एक नकारात्मक आर्थिक चक्र सुरू होऊ शकते. महागड्या आयातीमुळे महागाई वाढते, ज्यामुळे आयातीचे बिल वाढते. या वाढलेल्या आयातीच्या बिलामुळे चलनाचे आणखी अवमूल्यन होते. अवमूल्यन झालेले चलन मग आयातीच्या बिलात आणखी वाढ करते, ज्यामुळे आर्थिक आव्हानांचे चक्र कायम राहते.
