मुंबई: देशांतर्गत गुंतवणूकदारांचा वाढता प्रतिसाद, शेअर बाजारातील सकारात्मक वातावरण आणि परदेशी गुंतवणूकदारांचा परतलेला विश्वास यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच भारतीय भांडवली बाजारात निधी उभारणीला मोठी चालना मिळाली आहे. एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) , संस्थात्मक गुंतवणूकदार (क्यूआयपी), आंशिक समभाग विक्री (ओएफएस) आणि ब्लॉक डील्स यांच्या माध्यमातून १ लाख कोटींपेक्षा अधिक भांडवल उभारले आहे. बाजारातील तेजीचा फायदा घेत अनेक कंपन्या विस्तार, कर्जफेड आणि नवीन गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारातून निधी उभारत असल्याचे चित्र दिसत आहे.
एप्रिल महिन्यापासून सेन्सेक्स आणि निफ्टी या मुख्य निर्देशांकांनी प्रत्येकी जवळपास ७ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मात्र व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप, स्मॉलकॅप आणि मायक्रोकॅप समभागांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मिडकॅप १७ टक्के, स्मॉलकॅप २५ टक्के आणि मायक्रोकॅप निर्देशांक ३० टक्क्यांहून अधिक वधारला आहे. या मोठ्या तेजीमुळे कंपन्यांना मूल्यांकन वाढवण्याची आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची उत्तम संधी मिळाली आहे.
एप्रिल २०२६पासून इक्विटीमार्गे निधी उभारणीला चांगलाच वेग आला असून, ब्लॉक आणि बल्क डील्सद्वारे एकूण ५६,५८०.२ कोटींची उभारणी झाली आहे. यामध्ये अदानी पोर्ट्सने सर्वाधिक ७,४८६.२ कोटी उभारले, तर अल्टियस टेलिकॉम इन्फ्राने ५,४९६.२ कोटी, बिलियनब्रेन गॅरेजने ५,३२५.८ कोटी, लेन्सकार्ट सोल्यूशन्सने विविध व्यवहारांमधून अनुक्रमे ५,३१३.६ कोटी उभारले आहे. तसेच अदानी एंटरप्रायझेस १,४३५.२ कोटी उभारले. मुख्य मंचावर आयपीओ बाजारात एप्रिल २०२६मध्ये १,०७६ कोटींची निधी उभारणी झाली, मे महिन्यात एकही आयपीओ मुख्य मंचावर आला नाही, तर जूनमध्ये हा आकडा २,७१८.१ कोटींवर पोहोचला. दुसरीकडे, एसएमई आयपीओ विभागात सातत्याने वाढ दिसून आली. एप्रिलमध्ये २०४.१ कोटी, मेमध्ये ७५०.६ कोटी आणि जूनमध्ये ९३०.३ कोटी इतका निधी उभारण्यात आला.
क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट या मार्गानेही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारले. एप्रिलमध्ये २,५०० कोटी, मेमध्ये ४,३५० कोटी, जूनमध्ये तब्बल १६,४८९.९ कोटी, तर जुलै महिन्यात आतापर्यंतच १५,००० कोटींची उभारणी झाली आहे. यावरून संस्थात्मक गुंतवणूकदारांचा भारतीय कंपन्यांवरील विश्वास वाढत असल्याचे दिसून येते.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या आंशिक समभाग विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. एप्रिलमध्ये एकही ओएफएस झाला नसला तरी मेमध्ये ७,७८० कोटी आणि जूनमध्ये १०,९३३ कोटींची निधी उभारणी झाली. एकूणच, एप्रिलपासून आयपीओ, एसएमई आयपीओ, क्यूआयपी, ओएफएस आणि ब्लॉक डील्स या सर्व माध्यमांतून भांडवली बाजारातील निधी उभारणीला जोरदार गती मिळाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
