मुंबई : अमेरिका-भारत व्यापार कराराबाबत अनिश्चितता संपुष्टात आणणाऱ्या झालेल्या उभयतांमधील सहमतीचे मंगळवारी भांडवली बाजाराने उत्साही स्वागत केले. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी तब्बल पाच टक्क्यांहून मोठी मुसंडी मारताना दिसले. व्यापार करारानुसार, अमेरिका भारतावरील आयात शुल्क १८ टक्क्यांपर्यंत कमी करणार आहे, जे भारतीय वस्तूंच्या निर्यातीला चालना देणारे ठरेल.
सोमवारी रात्री उशिरा आलेल्या व्यापार कराराच्या वृत्तामुळे मंगळवारच्या सत्रात अपेक्षित तेजीसह बाजाराने सुरुवात केली. सेन्सेक्सने सत्रातंतर्गत ४,२०५.२७ अंशांनी अर्थात ५.१४ टक्क्यांनी वधारून ८५,८७१.७३ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. या कमाईला नंतर उतार लागला असला तरी दिवसअखेर निर्देशांक २,०७२.६७ अंशांनी वधारून, ८३,७३९.१३ पातळीवर स्थिरावला. निफ्टीने देखील ६३९.१५ अंशांची कमाई करून २५,७२७.५५ पातळीवर बंद नोंदवला. दिवसादरम्यान, या निर्देशांकाने देखील १,२५२.८ अंशांची मजल मारत २६,३४१.२० ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरील संभाषणानंतर सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, भारत आणि अमेरिकेने व्यापार करारावर सहमती दर्शवली असल्याचे सांगितले. ज्या अंतर्गत अमेरिका भारतीय वस्तूंवरील सध्याचे २५ टक्के आयात शुल्क हे १८ टक्क्यांपर्यंत कमी करेल.
प्रदीर्घ-बहुप्रतीक्षित भारत-अमेरिका व्यापार करार आणि रुपयाच्या मजबुतीमुळे देशांतर्गत भांडवली बाजारात लक्षणीय वाढ झाली. शिवाय परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून नव्याने गुंतवणुकीचा प्रवाह सुरू होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारतीय वस्तूंवरील अमेरिकेचे आयात शुल्क ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारताची स्पर्धात्मक स्थिती सुधारण्याची आशा आहे. वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, मत्स्यपालन, रत्ने व आभूषण यांसारख्या क्षेत्रांचा अमेरिकी बाजारपेठेशी मोठा संबंध आहे. उल्लेखनीय म्हणजे या क्षेत्रांना ताज्या केंद्रीय अर्थसंकल्पाने देखील बळ दिले आहे. यामुळे या निर्यात-केंद्रित क्षेत्रांबद्दलचा दृष्टिकोन मजबूत झाला आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये ९.१२ टक्क्यांची वाढ झाली. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, इंटरग्लोब एव्हिएशन, पॉवर ग्रिड, सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग तेजीसह बंद झाले. तर टेक महिंद्र आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स हे घसरणीसह बंद झाले. या व्यापार करारामुळे वस्त्रोद्योग, चामडे, रत्ने आणि दागिने, मत्स्य उत्पादनांची निर्यात आणि विशेष रसायने क्षेत्रातील समभागांमध्ये मोठी वाढ झाली.
गुंतवणूकदार १९ लाख कोटींनी श्रीमंत
मंगळवारच्या सत्रातील उत्साही तेजीमुळे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सुमारे १९ लाख कोटी रुपयांनी वाढून सुमारे ४७४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गुंतवणूकदारांसाठी एकाच सत्रातील सर्वात मोठ्या संपत्ती निर्मितीच्या घटनांपैकी एक ठरले आहे.
भारत-अमेरिका व्यापार करार हा दोन्ही राष्ट्रांसाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे, जो गुंतवणूक आणि विकासाच्या प्रचंड संधी खुल्या करेल. मुक्त व्यापार करारांची ही मालिका जागतिक चौकटींमध्ये भारताचे स्थान मजबूत करेल. – सुनील भारती मित्तल, संस्थापक आणि अध्यक्ष, भारती एंटरप्रायझेस
द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध मजबूत करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. हा करार भारताच्या विकासाच्या महत्त्वाकांक्षेला महत्त्वपूर्ण गती देईल. – अनिश शाह, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी, महिंद्र समूह
कमी झालेल्या शुल्कामुळे दोन्ही महान देशांमधील सामरिक आणि आर्थिक संबंध मजबूत होण्यास मदत होईल आणि गुंतवणूक व सहकार्याच्या अतिरिक्त संधी खुल्या होतील. आदित्य बिर्ला समूह हा अमेरिकेतील सर्वात मोठा भारतीय गुंतवणूकदार आहे, ताजा करार पुरवठा साखळीच्या मजबुतीस फायद्याचा ठरेल. – कुमार मंगलम बिर्ला, अध्यक्ष, आदित्य बिर्ला समूह
सेन्सेक्सची सत्रातंर्गत सर्वात मोठी वाढ
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, ३ जून २०२४ ला मतदानोत्तर चाचणीतील कौल आणि ५ जून २०२४ ला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाची निश्चिती स्पष्ट झाल्यानंतर, सेन्सेक्स त्या दिवसांतील सत्रांतर्गत मोठी उसळी घेताना दिसला होता, त्यानंतरची अलिकडच्या काळातील सत्रांतर्गत सर्वात मोठी झेप सेन्सेक्सने मंगळवारी नोंदवली. गत काळातील त्याच्या १० मोठ्या मुसंड्या अशा-
| तारीख | वाढ |
| ३ फेब्रुवारी २०२६ | ४,२०५.२७ |
| ५ डिसेंबर २०२५ | ३,०४१.५० |
| ३ जून २०२४ | २,७७७.५४ |
| ७ एप्रिल २०२० | २,५६६.७० |
| १ फेब्रुवारी २०२१ | २,४७८.६३ |
| ५ जून २०२४ | २,४५५.७७ |
| २० सप्टेंबर २०१९ | २,२८४.८५ |
| २० मार्च २०२० | २,१२९.९७ |
| २५ मार्च २०२० | २,११६.१६ |
| १८ मे २००९ | २,११०.७९ |

