मुंबई: देशाची परकीय चलन गंगाजळी ३० जानेवारी रोजी सरलेल्या आठवड्यात १४.३६ अब्ज डॉलरने वाढून, ७२३.७७ अब्ज डॉलरच्या नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली असल्याचे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केले.

त्या आधीच्या आठवड्यात, परकीय चलन साठा ८.०५ अब्ज डॉलरने वाढून ७०९.४१ अब्ज डॉलर झाला होता, जो सप्टेंबर २०२४ मध्ये नोंदवलेल्या ७०४.८९ अब्ज डॉलरच्या पूर्वीच्या विक्रमी उच्चांकापेक्षा अधिक होता. जागतिक पातळीवर सोन्याच्या किमतीमध्ये तीव्र वाढ सुरू आहे. परिणामी, मध्यवर्ती बँकेकडील सोन्याच्या साठ्याचे मूल्य १४.५९ अब्ज डॉलरने वाढून १३७.६८ अब्ज डॉलर झाले आहे, असे रिझर्व्ह बँकेने सांगितले.
चीन, जपान, रशिया आणि स्वित्झर्लंडनंतर सर्वाधिक परकीय गंगाजळी असणारा भारत ही जगातील पाचवी अर्थव्यवस्था आहे. बाह्य व्यापार आणि आयातीच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सध्या आपण सुस्थितीत आहोत, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.

वर्षभरापासून डॉलरच्या तुलनेत रुपयात सुरू असलेल्या घसरणीमुळे अनावश्यक अस्थिरता रोखण्यासाठी चलन साठ्याचा वापर केला गेल्याचे बोलले जाते आहे. शिवाय सद्य:स्थिती डॉलरच्या तुलनेत रुपयाने ९२ ची नीचांकी पातळी ओलांडली होती. मात्र असे असूनही परकीय गंगाजळीने उच्चांकी पातळी गाठली आहे. परकीय चलन साठ्यावर असलेल्या युरो, पाउंड आणि येन यांसारख्या गैर-अमेरिकी चलनांच्या मूल्याच्या वाढीचा किंवा घसरणीचा परिणाम देखील होत असतो.

देश परकीय गंगाजळी
चीन ३,६४३ अब्ज डॉलर
जपान १,३२४ अब्ज डॉलर
स्वित्झर्लंड १,००७ अब्ज डॉलर
रशिया ७३४ अब्ज डॉलर
भारत ७२३ अब्ज डॉलर