India GST Collection : जागतिक अर्थव्यवस्था संकटात असतानाही भारताने देशांतर्गत प्रगतीत चांगली कामगिरी केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एप्रिल महिना अत्यंत आश्वासक ठरला आहे. एकूण जीएसटी संकलनात वार्षिक ८.७% वाढ झाली असून, आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक नोंदवला गेला आहे. मागील वर्षी एप्रिल २०२५ मध्ये हा आकडा २.२३ लाख कोटी रुपये होता. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांचा वाटा सर्वाधिक आहे.

महसुली आकडेवारीचा लेखाजोखा

सरकारी तिजोरीत एप्रिल २०२६ मध्ये सुमारे २.४३ लाख कोटी रुपये जीएसटी जमा झाला. देशांतर्गत व्यवहारातून १.८५ लाख कोटी रुपये मिळाले असून, त्यात ४.३% वाढ झाली आहे. तर आयातीतून मिळणाऱ्या जीएसटीमध्ये २५.८% ची मोठी वाढ होऊन तो ५७,५८० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये केद्रीय जीएसटी ५२,१४० कोटी रुपये, राज्यांचा वाटा ६१,३३१ कोटी रुपये इतका आहे. तर एकात्मिक जीएसटी ७१,६५१ कोटी रुपये जमा झाले.

परतावा आणि निव्वळ संकलन

परताव्याच्या बाबतीतही एप्रिलमध्ये मोठी वाढ झाली असून एकूण ३१,७९३ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला, जो मागील वर्षाच्या तुलनेत १९.३ टक्क्यांनी जास्त आहे. सर्व परतावे वजा जाता निव्वळ जीएसटी संकलन २.११ लाख कोटी रुपये इतके झाले आहे. या परताव्यांमध्ये देशांतर्गत परताव्यांत ५४.६ टक्क्यांची प्रचंड वाढ झाली असली तरी, निर्यात संबंधित परताव्यामध्ये मात्र १४ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. राज्यांच्या महसुलातील ही तफावत देशातील आर्थिक सुधारणेचा आणि उपभोग यातील व्यस्त प्रमाण दाखवते.

महाराष्ट्र पुन्हा अव्वल

राज्यांच्या कामगिरीचा विचार करता महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांनी राज्य जीएसटी संकलनात मोठी आघाडी घेतली आहे. महाराष्ट्राने वार्षिक ४० टक्क्यांची भरघोस वाढ नोंदवली असून कर्नाटकने ४२ टक्क्यांच्या वाढीसह सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तेलंगणा राज्यानेही ३६ टक्क्यांच्या वाढीसह आपली आर्थिक गती कायम राखली आहे, तर पुद्दुचेरीमध्ये तब्बल १०८ टक्क्यांची विक्रमी वाढ दिसून आली. दुसरीकडे, लडाखमध्ये संकलनात ८ टक्क्यांची घट झाली असून झारखंडमधील वाढ स्थिर राहिली आहे.