India Seafood Export At High : भारताचा सर्वात मोठा सागरी खाद्य आयातदार असलेल्या अमेरिकेने टॅरिफ लादल्यानंतर भारताने राबवलेला बी प्लॅन यशस्वी ठरला आहे. मध्यपूर्वेतील तणाव आणि व्यापारातील आव्हाने असूनही, भारताच्या सागरी खाद्य निर्यात क्षेत्राने २०२५-२६ या आर्थिक वर्षात अभूतपूर्व भरारी घेतली आहे. भारताची सी-फूड निर्यात आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली असून, ७२,३२५.८२ कोटी रुपयांचा (८.२८ अब्ज डॉलर) टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, भारताचा पारंपरिक मोठा बाजार असलेल्या अमेरिकेने आयात करांमुळे झटका दिला असतानाही, चीन आणि युरोपीय देशांमध्ये सागरी उत्पादनांची निर्यात वाढली आहे.

विक्रमी निर्यातीची आकडेवारी

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारताची सागरी खाद्य निर्यातीची एकूण मात्रा १९.३२ लाख मेट्रिक टन इतकी झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही कामगिरी ऐतिहासिक मानली जात आहे. यामध्ये गोठवलेले कोळंबीने बाजी मारली असून भारताच्या एकूण सागरी निर्यातीत कोळंबीचा वाटा मोठा राहिला आहे. निर्यातीतून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या दोन तृतीयांश हिस्सा एकट्या कोळंबीचा आहे. निर्यातीतून एकूण कमाई ४७,९७३.१३ कोटी रुपये (५.५१ अब्ज डॉलर) झाली आहे.

अमेरिकेचा फटका, पण चीनकडून भरपाई

भारतासाठी अमेरिका हा नेहमीच सर्वात मोठा खरेदीदार राहिला आहे. मात्र, यावेळी अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत १९.८% ची मोठी घट झाली आहे. अमेरिकेने लागू केलेल्या परस्पर आयात शुल्कामुळे हा फटका बसला आहे. मात्र, भारताने आपला ‘प्लॅन-बी’ यशस्वीपणे राबवला आणि इतर बाजारपेठा शोधल्या. चिनी बाजारपेठेत भारतीय सी-फूडच्या निर्यातीत २२.७% ची मोठी वाढ झाली आहे. युरोपीय देशांना होणाऱ्या निर्यातीत ३७.९% ची अधिकची भर पडली. जपानला होणाऱ्या निर्यातीतही ६.५५% ची सकारात्मक वाढ झाली आहे.

बाजाराचे विविधीकरण ठरले यशस्वी

अमेरिकेने पाठ फिरवल्यानंतर केवळ एका बाजारावर अवलंबून न राहता विविध देशांमध्ये व्यापार विस्तारल्याने हा विक्रम शक्य झाला आहे. फ्रोजन मासे, स्क्विड, कटलफिश आणि सुके मासे यांसारख्या उत्पादनांनीही निर्यातीत महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय ‘फिशमील’ आणि ‘फिश ऑईल’च्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे.