Indra Nooyi Statement India China US : पेप्सिको कंपनीच्या माजी सीईओ इंद्रा नुयी यांनी भारत, चीन आणि अमेरिकेची तुलना करत केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. अनिवासी भारतीय असलेल्या इंदिरा नुयी यांनी अमेरिका हा उत्तम देश असून चीनही शिस्तबद्ध आहे. मात्र, भारतात परिस्थिती चांगली नाही, असं धक्कादायक विधान केल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
“भारतात मी कधीच सीईओ बनू शकले नसती…”
नुयी म्हणाल्या, “मी अमेरिकेशिवाय जगातील इतर कोणत्याही देशात, अगदी भारतातही कधीच सीईओ बनू शकले नसती. याचे कारण अमेरिकेतील व्यवस्था गुणवत्तेला प्राधान्य देते. येथील व्यवसस्थेला तुम्ही स्त्री आहात की पुरुष, याच्याशी काहीही देणेघेणे नसते”, अशा शब्दांत त्यांनी अमेरिकन कॉर्पोरेट संस्कृतीचे कौतुक केले. गुणवत्तेचा आदर आणि प्रतिभेला मिळणारे बक्षीस यांमुळेच आपण जगातील एका बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीचे नेतृत्व करू शकलो, असं त्या म्हणाल्या.
भारत, चीन आणि ‘गोंधळाचे सौंदर्य’
नुयी म्हणाल्या पर्यटनासाठी मला चीन आवडतो. कारण, चीन शिस्तप्रिय आणि सुविधाजनक असल्याने परदेशी पर्यटकांसाठी तिथे फिरणे किंवा वेळ घालवणे खूप सोपे आहे. याउलट, जर तुम्हाला स्वच्छ आणि अत्यंत शिस्तबद्ध जीवन जगण्याची सवय असेल, तर भारतात राहणे अशक्य होईल. भारतीय रस्त्यांवर ट्रॅफिकमधून फिरणाऱ्या गाईंचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की, हे दृश्य बाहेरील व्यक्तीसाठी अनपेक्षित वाटू शकते. परंतु, भारतीय लोक जन्मापासूनच या वातावरणात वाढल्यामुळे ते यातून सहज मार्ग काढतात.
गरिबीतून बाहेर पडून जागतिक महासत्ता
चीनच्या आर्थिक आणि जागतिक महासत्ता बनण्याच्या प्रवासावरही त्यांनी मत व्यक्त केले. एका केंद्रीय नियंत्रण असलेल्या व्यवस्थेमुळे चीनने अत्यंत वेगाने गरिबीतून बाहेर पडून जागतिक स्तरावर प्रगती केली. याउलट, भारतात लोकशाही असल्यामुळे प्रगतीचा वेग संथ असून भारत अजूनही महासत्ता बनण्यासाठी संघर्ष करत असल्याचे नुयी म्हणाल्या.
