IT CEO Salary : आयटी क्षेत्रात सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं वारं सुरू असून कंपन्यांच्या कामगिरीत मोठी घसरण होत आहे. याचा परिणाम कंपनीतील अधिकाऱ्यांच्या पगारावरही झाल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच देशातील आघाडीच्या टेक कंपन्यांच्या सीईओंना मिळणाऱ्या मानधनाची आकडेवारी समोर आली. यामध्ये ‘इन्फोसिस’चे सीईओ सलील पारेख यांनी आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये देशातील प्रमुख आयटी सेवा कंपन्यांमध्ये पारेख हे सर्वाधिक वेतन घेणारे सीईओ ठरले आहेत. दुसरीकडे, ‘विप्रो’चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पल्लिया यांच्या वार्षिक मानधनात घट झाली आहे, तरी ते या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत.

सलील पारेख यांना किती पगार मिळतो?

इन्फोसिसचे प्रमुख सलील पारेख यांनी आर्थिक वर्ष २६ मध्ये एकूण तब्बल ८२.६ कोटी रुपयांचे बंपर पॅकेज मिळाले. पारेख यांच्या मानधनाचा एक मोठा हिस्सा स्टॉक लिंक्ड रिवॉर्ड्सशी (शेअर्सच्या स्वरूपातील मिळणारे बक्षीस) जोडलेला आहे. त्यांच्या एकूण पॅकेजमध्ये ५०.७५ कोटी रुपयांचे ‘रिस्ट्रिक्टेड स्टॉक युनिट्स’ आणि २३.३५ कोटी रुपयांच्या स्टॉक-बेस्ड इन्सेंटिव्ह्जचा समावेश आहे.

विप्रोचे श्रीनिवास पल्लिया दुसऱ्या स्थानी

विप्रोच्या वार्षिक अहवालानुसार, श्रीनिवास पल्लिया यांना आर्थिक वर्ष २६ मध्ये ४९.६ कोटी रुपये मानधन मिळाले. मागील वर्षी हे वेतन ५३.६ कोटी रुपये होते, म्हणजे त्यात ७.४ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. पल्लिया यांचा मूळ पगार आणि भत्ते मागील वर्षातील १४.६ कोटींवरून वाढून १५.५ कोटी रुपये झाले आहेत. मात्र, त्यांच्या व्हेरिएबल पे मध्ये झालेली मोठी घसरण यासाठी कारणीभूत ठरली. त्यांचा व्हेरिएबल पे १४.५ कोटींवरून थेट ९.९ कोटी रुपयांवर आला. याव्यतिरिक्त, त्यांना ‘इतर’ अंतर्गत २३.३ कोटी रुपये आणि डिफर्ड कॉम्पन्सेशन बेनिफिट्स म्हणून सुमारे १ कोटी रुपये मिळाले.

सर्वात मोठ्या कंपनीच्या सीईओ घेतात सर्वात कमी पगार

बाजार भांडवलानुसार टाटा समूहाची टीसीएस कंपनी देशातील सर्वात मोठी टेक कंपनी आहे. मात्र, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ के. क्रिथीवासन यांना या वर्षात २८ कोटी रुपये मिळाले. आतापर्यंत ज्या प्रमुख आयटी कंपन्यांनी आपल्या मानधनाची आकडेवारी जाहीर केली आहे, त्यामध्ये क्रिथीवासन यांचे पॅकेज सर्वात कमी आहे.

रिशाद प्रेमजी यांच्याही मानधनात मोठी कपात

विप्रोचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन रिशाद प्रेमजी यांच्याही वार्षिक उत्पन्नाला या वर्षी मोठा फटका बसला आहे. त्यांचे मानधन आर्थिक वर्ष २५ मधील १३.८ कोटी रुपयांवरून थेट ७.३ कोटी रुपयांवर आले आहे. त्यांचा व्हेरिएबल पे देखील ७ कोटींवरून २.२ कोटी रुपयांवर घसरला आहे.