Infosys Hiring : याच महिन्यात मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि ओरॅकलसारख्या दिग्गज आयटी कंपन्यांनी तब्बल ४६ हजार कर्मचारी कपात केली. तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या धोक्यात आल्याच्या भीतीमध्ये वावरणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांसाठी इन्फोसिसने आशेचा किरण दाखवला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलिल पारेख यांनी स्पष्ट केले आहे की, एआयचा वापर वाढवला तरी कंपनीत कोणतीही कर्मचारी कपात केली जाणार नाही. याउलट, कंपनी आपल्या विस्तारासाठी नवीन टॅलेंटला संधी देणार आहे. ही बातमी आयटी अभियंते आणि फ्रेशर्ससाठी संजीवनी देणारी आहे.

इन्फोसिसचा ‘नो लेऑफ’ प्लॅन

सलिल पारेख यांनी ‘मनीकंट्रोल’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, इन्फोसिस गरजेनुसार एआय तंत्रज्ञान लागू करेल, मात्र त्यामुळे कोणाचीही नोकरी जाणार नाही. ऑटोमेशन आणि वर्कफोर्स रिस्ट्रक्चरिंगनंतरही कोणाचीही नोकरी हिरावून घेण्याचा कंपनीचा कोणताही विचार नाही. गेल्या वर्षीही कंपनीने कोणतीही कर्मचारी कपात केली नव्हती आणि भविष्यातही तसा कोणताही प्लॅन नाही.

२०,००० फ्रेशर्सना मिळणार संधी

केवळ नोकऱ्या टिकवणेच नव्हे, तर नवीन भरतीवरही कंपनीचा भर असल्याचे त्यांनी जाहीर केले. या वर्षी कंपनीने कॅम्पस सिलेक्शनच्या माध्यमातून २०,००० पेक्षा जास्त पदवीधरांची भरती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षीही कंपनीने इतक्याच मोठ्या प्रमाणात फ्रेशर्सना संधी दिली होती. नवीन भरती होणाऱ्या फ्रेशर्सना एआय टूल्ससह आणि त्याशिवाय काम करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून ते भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहतील.

इतर कंपन्यांच्या तुलनेत इन्फोसिसची भूमिका

इन्फोसिसचे हे पाऊल अशा वेळी आले आहे जेव्हा अनेक मोठ्या कंपन्यांनी तंत्रज्ञानाचे कारण देत हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये टीसीएसने सुमारे १२,५०० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. एचसीएल टेक, ओरॅकल आणि कॉग्निझंट यांसारख्या कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे.

इन्फोसिस १० मौल्यवान कंपनीच्या यादीतून बाहेर

इन्फोसिसची नवीन योजना चांगली असली तरी गेल्या वर्षभरातील कामगिरी गुंतवणूकदारांना निराश करणारी ठरली आहे. या वर्षात आतापर्यंत इन्फोसिसच्या शेअर्समध्ये सुमारे २९ टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीने ओपन एआयसोबत नुकताच एक करार केला आहे. मात्र, त्याचा फारसा प्रभाव बाजारात दिसला नाही. २०२५ च्या अखेरीस इन्फोसिसचे बाजार भांडवल ६.८ लाख कोटी रुपये होते, जे आता ४.७६ लाख कोटी रुपयांवर आले आहे. परिणामी देशातील १० मौल्यवान कंपन्यांच्या यादीतून कंपनी बाहेर पडली आहे.