पीटीआय, नवी दिल्ली
जागतिक पातळीवरील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या भावात अस्थिरता निर्माण झाली आहे. अनेक मध्यवर्ती बँकांकडून सोन्यात गुंतवणूक केली जात आहे. गुंतवणूकदारांचा कोणत्याही विशिष्ट चलनावर विश्वास नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडे वाढला आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी व्यक्त केले.

केंद्रीय अर्थसंकल्पांच्या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, सरकारकडून निर्गुंतवणुकीचा वेग कायम ठेवला जाणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना अधिकाधिक निर्गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. आयडीबीआय बँकेचे निर्गुंतवणूक सध्या प्रगतिपथावर आहे. सार्वजनिक कंपन्यांतील हिस्सा विक्रीतून सरकार बिगर कर महसुलाचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठेल.

केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ऑक्टोबर २०२२ मध्ये आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणासाठी इरादापत्रे मागविली होती. या बँकेत सरकारचा ३०.५८ टक्के हिस्सा तर भारतीय आयुर्विमा महामंडळाचा ३०.२४ टक्के हिस्सा आहे. सरकारकडे जानेवारी २०२३ मध्ये आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणासंदर्भात अनेक इरादापत्रे आली होती. आयडीबीआय बँकेच्या प्रस्तावित खरेदीदारांना सुरक्षा मंजुरी केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे. रिझर्व्ह बँकेने केलेल्या मूल्यमापनानंतर ही मंजुरी देण्यात आली.