GST on IPL Tickets : इंडियन प्रीमियर लीग चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी येण्याची शक्यता आहे. स्टेडियममध्ये बसून आयपीएल सामने पाहणे लवकरच स्वस्त होऊ शकते. कारण सरकार या तिकिटांवर लागणारा वस्तू आणि सेवा कर कमी करण्याच्या विचारात आहे. आयपीएल संघांनी वित्त मंत्रालयाकडे साकडे घातले असून, या स्पर्धेला ‘मनोरंजन’ऐवजी ‘क्रीडा स्पर्धा’ या श्रेणीत ठेवण्याची विनंती केली आहे. सध्या आयपीएलची तिकिटांवर तब्बल ४० टक्के जीएसटी भरावा लागत आहे. परिणामी आयपीएलचा सामाना प्रत्यक्ष पाहणे शिक्षा वाटू लागली आहे.
४० टक्क्यांचा भार होणार हलका?
सध्या आयपीएल तिकिटांवर तब्बल ४०% जीएसटी आकारला जातो. जर सरकारने फ्रँचायझींची मागणी मान्य केली, तर हा टॅक्स थेट १८% वर येईल. विशेष म्हणजे, बीसीसीआय आयोजित आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या तिकिटांवर केवळ १८% टॅक्स लागतो. मात्र, आयपीएलला ‘लक्झरी’ आणि ‘मनोरंजन’ श्रेणीत टाकल्याने त्यावर भरमसाट कर लादण्यात आला आहे.
‘सिन गुड्स’ श्रेणीत समावेशाला विरोध
गेल्या वर्षी केंद्र सरकारने जीएसटी स्लॅबमध्ये बदल करून ‘सिन गुड्स’ ही श्रेणी आणली होती. पान मसाला, तंबाकू, जुगार आणि कॅसिनो यांसारख्या आरोग्याला किंवा समाजाला घातक ठरणाऱ्या गोष्टींवर ४०% कर लावला जातो. आयपीएलचा समावेशही याच श्रेणीत झाल्याने संघांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संघांची भूमिका काय?
क्रिकेटची तुलना जुगार किंवा कॅसिनोशी करणे चुकीचे आहे. आयपीएल ही एक खेळ संस्कृती आहे, जी देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि क्रीडा क्षेत्राला चालना देते. आयपीएल हा असा खेळ आहे, ज्याचा आनंद समाजातील सर्व स्तरातील लोक कुटुंबासोबत घेतात. ७,५०० रुपयांपेक्षा महाग हॉटेल रूम किंवा बिझनेस क्लासच्या विमान प्रवासावर १८% जीएसटी असताना, क्रिकेट सामन्यावर ४०% कर का? असा सवाल संघांनी उपस्थित केला आहे.
चेंडू आता ‘जीएसटी कौन्सिल’च्या कोर्टात!
एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण आता जीएसटी कौन्सिलकडे पाठवण्यात आले आहे. कौन्सिलच्या आगामी बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. जर टॅक्समध्ये कपात झाली, तर तिकिटांचे दर मोठ्या प्रमाणावर कमी होतील, ज्याचा थेट फायदा लाखो क्रिकेट चाहत्यांच्या खिशाला होईल.
जागतिक स्पर्धेचे आव्हान
सध्या अमेरिका आणि सौदी अरब सारखे देश क्रिकेटमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. अशा वेळी भारतात इतका उच्च कर दर असल्यास, या खेळाच्या विकासावर आणि भारताच्या क्रीडा बाजारपेठेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
आयपीएल २०२६ मध्ये तब्बल ७४ सामन्यांचा रणसंग्राम
यंदाच्या आयपीएल स्पर्धेची सुरुवात हैदराबाद येथून २८ मार्च रोजी झाली. यामध्ये १० संघांमध्ये तब्बल ७८ सामने खेळले जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ३१ मे रोजी खेळला जाणार आहे.
