मुंबई : पश्चिम आशियातील घडामोडींमुळे भू-राजकीय अस्थिरता वाढल्यामुळे विमान कंपन्या, टूर आणि प्रवासाशी संबंधित सेवा प्रदात्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली आहे. वाढत्या युद्धच्या परिणामुळे अनेक विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली आहेत. शिवाय याचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर देखील झाल्याने अनेक पर्यटनाशीसंबंधित सेवा प्रदात्यांना फटका बसला आहे.

विमान सेवा कंपन्यांमध्ये इंटरग्लोब एव्हिएशनचा समभाग ७.५० टक्क्यांनी घसरला, तर स्पाइसजेटचा शेअर ७.२७ टक्क्यांनी घसरला. यात्रा ऑनलाइनचे शेअर ११.१४ टक्क्यांनी, इझी ट्रिप प्लॅनर्स ९.३९ टक्क्यांनी, टीबीओ टीईके ८.१९ टक्क्यांनी आणि थॉमस कुक ५.४० टक्क्यांनी घसरले. परिणामी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १,०२७.६० अंशांनी घसरून ८०,२८४.१७ पातळीवर व्यवहार करतो आहे.

इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे पश्चिम आशियातील अनेक हवाई क्षेत्रे बंद झाली आहेत, ज्यामुळे विमान वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.

इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सने (आयएटीओ) रविवारी नोंदवले की, आखाती देशांमधील संकटामुळे उद्भवलेल्या हवाई निर्बंधांमुळे, विशेषतः भारताला युरोपशी जोडणाऱ्या प्रमुख आखाती केंद्रांद्वारे क्षेत्रांसाठी बुकिंग रद्द करण्याच्या आणि वेळापत्रकात बदल करण्याच्या विनंत्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आयएटीओचे अध्यक्ष रवी गोसाईं यांनी सांगितले की, देशभरातील ट्रॅव्हल एजंट एअरलाइन्स आणि परदेशी भागीदारांसोबत जवळून काम करत आहेत जेणेकरून प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करता येईल आणि रीबुकिंग, परतफेड आणि पर्यायी मार्गांची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

इराण आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत वाढलेल्यया तणावाचा फटका तेलाच्या वाहतुकीलाही बसणार आहे. सध्या भारतीय तेलशुद्धीकरण कंपन्यांकडे किमान १० दिवस पुरेल इतके कच्चे तेल असून आणखी ५ ते ७ दिवस पुरेल इतका इंधन साठा आहे. त्यामुळे भारताला तातडीने तेलाची टंचाई जाणवण्याची शक्यता नाही, पण नजीकच्या काळात कच्च्या तेलाचे दर वाढण्याची आणि त्याचा अर्थकारणावर व्यापक परिणाम होण्याची भीती आहे, असे अधिकारी आणि तज्ज्ञांनी सांगितले. परिणामी देशांतर्गत विमान कंपन्यांच्या तिकीट दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.