IRDAI Motor Insurance 4 Tier Structure : जर तुमच्याकडे चारचाकी किंवा दुचाकी असेल आणि तुम्ही तिचा विमा उतरवत असाल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता मोटर इन्शुरन्स खरेदी करताना विमा कंपन्यांची मनमानी चालणार नाही, तर ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार वेगवेगळे कव्हर निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) मोटर इन्शुरन्ससाठी ४ स्तरीय नवीन रचना तयार केली आहे. ‘इर्डा’चा हा नवा नियम १५ डिसेंबर २०२६ पासून देशभरात लागू होणार आहे. या नियमांमुळे ग्राहकांना स्वस्त आणि पारदर्शक विम्या खरेदी करणे सोपं होणार आहे.
काय आहेत नवीन नियमांचे ४ स्तर?
- थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर : हा कव्हर घेणे प्रत्येक ग्राहकाला अनिवार्य आहे. या कव्हरमध्ये तुमच्या वाहनामुळे दुसऱ्या व्यक्तीचे किंवा त्याच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास विमा कंपनी भरपाईची जबाबदारी घेते.
- प्रवासी आणि मागील सहप्रवाशांचा कव्हर : हा पर्याय ऐच्छिक असणार आहे. कारमधील प्रवाशांसाठी आणि बाईकवर मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी यामध्ये कायदेशीर संरक्षण मिळेल.
- पर्सनल एक्सीडेंट कव्हर : वाहनाच्या नोंदणीकृत मालकासाठी हा कव्हर अनिवार्य असेल. मात्र, इतर प्रवासी किंवा ड्रायव्हरसाठी अतिरिक्त कव्हर घ्यायचे की नाही, हे ग्राहकाच्या इच्छेवर अवलंबून असेल.
- ओन डॅमेज कव्हर : तुमच्या स्वतःच्या कार किंवा बाईकच्या नुकसानीची भरपाई यामध्ये मिळते. हा कव्हरसुद्धा ऐच्छिक असेल.
ग्राहकांसाठी ५ मोठे फायदे
- आता विमा कंपन्यांना एकूण प्रीमियम सांगण्याऐवजी प्रत्येक कव्हरचा दर वेगळा सांगावा लागेल. यामुळे ग्राहक कोणत्या सुविधेसाठी किती पैसे मोजत आहेत, हे स्पष्ट कळेल.
- गाडीच्या आरटीओ पासिंगनुसार असणाऱ्या सीट क्षमतेच्या आधारे प्रवाशांचे कव्हर निश्चित होईल. यामध्ये वाहनाचा मालक आणि त्याचे जवळचे नातेवाईक जसे की आई-वडील, पती-पत्नी आणि मुले यांचा समावेश नसेल, त्यांच्यासाठी वेगळे नियम असतील.
- विमा खरेदी करताना कंपन्यांना ग्राहकांना ‘कस्टमर ऑप्शन फॉर्म’ आणि ‘कस्टमर इन्फॉर्मेशन शीट (ज्यात सोप्या भाषेत नियमांची माहिती असेल) देणे बंधनकारक असेल.
- ज्यांच्याकडे आधीपासून फक्त थर्ड-पार्टी इन्शुरन्स आहे, त्यांना पॉलिसी रद्द करण्याची गरज नाही. ते अतिरिक्त प्रीमियम देऊन प्रवाशांच्या सुरक्षेचे कव्हर विद्यमान पॉलिसीमध्येच जोडू शकतात.
- नको असलेले कव्हर वगळून ग्राहक स्वतःच्या बजेटनुसार योग्य विमा पॉलिसी तयार करू शकतील.
बदलाचे मूळ कारण काय?
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या ‘नॅशनल इन्शुरन्स कंपनी विरुद्ध थुंगला धना लक्ष्मी’ या खटल्यादरम्यान मोटर इन्शुरन्स मधील विविध कव्हर स्पष्ट आणि स्वतंत्र करण्याची गरज असल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर इर्डाने विमा क्षेत्र अधिक पारदर्शक आणि ग्राहककेंद्री बनवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
