मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ब्लू-चिप कंपन्यांच्या समभागांमधील घसरणीच्या माऱ्यामुळे बाजारातील तेजी मर्यादित राहिली आणि सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी किरकोळ वाढीसह बंद झाले. मंगळवारच्या सत्रातील लक्षणीय तेजीनंतर, सेन्सेक्स ७८.५६ अंशांनी वधारून ८३,८१७.६९ पातळीवर बंद झाला. सत्रादरम्यान, त्याने ८३,९४७.५३ अंशांची  उच्चांकी आणि ८३,११९.९५ अंशांची नीचांकी पातळी गाठली. निफ्टी ४८.४५ अंशांनी वाढून २५,७७६ पातळीवर स्थिरावला.

कृत्रिम प्रज्ञा नवउद्यमी अर्थात एआय स्टार्टअप अँथ्रोपिकने एंड-टू-एंड वर्कफ्लो ऑटोमेशन प्रॉडक्टिव्हिटी प्रणाली सादर केल्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. एआयमधील जलद प्रगतीमुळे पारंपारिक सॉफ्टवेअर व्यवसाय प्रारूपांमध्ये व्यत्यय येऊन कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्र यासारख्या आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये ७ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. बीएसई आयटी निर्देशांक ५.४९ टक्क्यांनी घसरून ३५,१०९.५१ पातळीवर स्थिरावला.

देशांतर्गत आघाडीवर तेल आणि वायू, ग्राहकोपयोगी वस्तू, धातू आणि वाहन निर्मिती क्षेत्रातील समभागांमध्ये जोरदार वाढ झाली असताना, जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमधील घसरणीमुळे देशांतर्गत आयटी कंपन्यांच्या समभागांना विक्रीच्या दबावाला सामोरे जावे लागले. सेन्सेक्समधील कंपन्यांपैकी, इटर्नल, ट्रेंट, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड आणि मारुती यांनी बाजारातील तेजीला बळ दिले. मंगळवारच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ५,२३६.२८ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.

भारत आणि अमेरिकेने व्यापार कराराच्या आराखड्यावर सहमती दर्शवली आहे, ज्या अंतर्गत अमेरिका भारतीय वस्तूंवरील शुल्क सध्याच्या ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत खाली आणेल. ही घोषणा महत्त्वाची आहे कारण अमेरिकेने २७ ऑगस्ट २०२५ पासून अमेरिकी बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या भारतीय वस्तूंवर मोठे शुल्क लावले आहे.

अँथ्रोपिकने नवीन एआय-आधारित ऑटोमेशन सादर केल्यामुळे पारंपारिक आउटसोर्सिंगच्या मागणीत घट होण्याच्या चिंतेमुळे आयटी कंपन्या चिंतेत आहे.  तर  अमेरिका-इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक गुंतवणूकदार चिंतेत आहेत.  – विनोद नायर,  संशोधन प्रमुख,  जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड