Cigarette Price Hike Classic Connect Gold Flake Impact: आयटीसी लिमिटेडने काही निवडक सिगारेट ब्रँड्सच्या किमती पुन्हा वाढवल्या आहेत. यामध्ये क्लासिक कनेक्ट आणि गोल्ड फ्लेक सुपर स्टार यांच्या एमआरपी किमतीत वाढ झाली असून, नवीन किमती असलेला माल बाजारात येण्यास सुरुवातही झाल्याची माहिती पुरवठादारांनी दिल्याचे, एनडीटीव्ही प्रॉफिटच्या वृत्तात म्हटले आहे.
क्लासिक कनेक्टच्या २० सिगारेट्सच्या पाकिटाची किंमत आता ४२८ रुपये झाली आहे, जी पूर्वी ३९० रुपये होती. ही ९.७४ टक्क्यांची वाढ आहे. त्याचबरोबर, पुरवठादारांच्या माहितीनुसार गोल्ड फ्लेक सुपर स्टारच्या १० सिगारेट्सच्या पॅकची किंमत ७९ रुपयांवरून वाढवून ८९ रुपये करण्यात आली आहे. ही १२.६६ टक्क्यांची वाढ आहे.
१ फेब्रुवारीपासून सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादनांवर ४० टक्के जीएसटी दर लागू झाला असून, त्यासोबतच अतिरिक्त उत्पादन शुल्काची नवीन रचनाही अंमलात आली आहे. कराचा वाढलेला बोजा भरून काढण्यासाठी आयटीसी आणि सिगारेट उत्पादक कंपन्यांनी त्यानंतर आपल्या अनेक ब्रँड्सच्या किमती वाढवल्या.
नोमुरा या संस्थेने यापूर्वीच नमूद केले होते की, आयटीसीने केलेल्या या दरवाढीचा उद्देश करातील बदलाचा परिणाम काही प्रमाणात कमी करणे हा होता. मात्र त्याच वेळी त्यांनी असा इशाराही दिला होता की, वाढलेल्या किमतींमुळे विक्रीच्या प्रमाणावर दबाव येऊ शकतो.
फेब्रुवारीमध्ये, उद्योग क्षेत्रातील अहवालांवरून असे दिसून आले होते की, आयटीसीने क्लासिक कनेक्टची किंमत ३०० रुपयांवरून ३६० रुपये आणि त्यानंतर ३९० रुपये केली होती. तसेच गोल्ड फ्लेक सुपर स्टारची किंमत ५९ रुपयांवरून ७० रुपये करण्यात आली होती. त्यानंतर आयटीसीने कमी किमतीची उत्पादने आणि ‘पॉकेट-पॅक’ (लहान पॅक) स्वरूपातील काही विशिष्ट उत्पादनांच्या किमती पुन्हा वाढवल्या.
वितरकांच्या स्तरावरील ताज्या पाहणीवरून असे दिसून येते की, नव्या किमती असलेला माल आता बाजारात येत आहे. याचा अर्थ असा की, जुना साठा संपून त्याजागी नवीन माल आल्यानंतर ग्राहकांना सिगारेटच्या पाकिटांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
