ITR Filing 2026 : आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी प्राप्तीकर परतावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही जर स्वतः पेन्शनधारक असाल किंवा तुम्हाला फॅमिली पेन्शन मिळत असेल तर प्राप्तिकराचे काही महत्त्वाचे नियम तुम्हाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा लोक या दोन्ही पेन्शनला एकच समजण्याची चूक करतात. परंतु, आयकर कायद्यात दोघांसाठी पूर्णपणे वेगवेगळे नियम आहेत. यामध्ये गफलत झाल्यास प्राप्तिकर विभागाकडून नोटीस येण्याचा धोका असतो.

सामान्य पेन्शनवर ‘वेतन’ टॅक्स

प्राप्तिकर विभागाच्या नियमांनुसार, खासगी किंवा सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या सामान्य पेन्शनला वेतन मानले जाते. कारण ही पेन्शन कर्मचाऱ्याला त्याने केलेल्या नोकरीच्या बदल्यात मिळते. त्यामुळे पेन्शनमधून मिळणारे उत्पन्न पगारातून मिळणारे उत्पन्न या हेडखाली टॅक्सपात्र ठरते.

पेन्शनधारकांसाठी स्टँडर्ड डिडक्शन

सामान्य पेन्शनला वेतन मानले जात असल्यामुळे पेन्शनधारकांना स्टँडर्ड डिडक्शनचा मोठा फायदा मिळतो. यात जुन्या कर रचनेत ५०,००० रुपयांपर्यंतचे स्टँडर्ड डिडक्शन मिळते. तर नवीन कर रचनेत याची मर्यादा ७५,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्यामुळे टॅक्सचा बोजा लक्षणीयरीत्या कमी होतो.

फॅमिली पेन्शन म्हणजे काय?

मूळ कर्मचारी किंवा पेन्शनधारकाच्या निधनानंतर त्याच्या पती/पत्नीला किंवा कायदेशीर वारसाला मिळणाऱ्या रक्कमेला ‘फॅमिली पेन्शन’ म्हटले जाते. या पेन्शनला ‘वेतन’ मानले जात नाही, कारण पेन्शन मिळवणारी व्यक्ती आणि पेन्शन देणारी संस्था यांच्यात थेट नोकरीचा संबंध नसतो. उदा. मृत्यू झाल्यानंतर सैनिकाच्या वारसांना मिळणारी पेन्शन फॅमिली पेन्शन वर्गात मोडली जाते.

फॅमिली पेन्शनवर ‘इतर स्रोतांतून उत्पन्न’ म्हणून टॅक्स

फॅमिली पेन्शन ही इतर स्रोतांतून मिळणारे उत्पन्न या हेडखाली करपात्र ठरते. त्यामुळे यावर वेतनाप्रमाणे थेट स्टँडर्ड डिडक्शन मिळत नाही, तर यासाठी वेगळ्या प्रकारच्या सवलतीची तरतूद आहे. जुन्या कर रचनेत फॅमिली पेन्शनच्या एकूण रक्कमेचा एक तृतीयांश भाग किंवा १५,००० रुपये, यांपैकी जी रक्कम कमी असेल, तेवढी वजावट मिळते. नव्या कर रचनेत ही वजावटीची मर्यादा वाढवून आता २५,००० रुपये करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना ‘अ‍ॅडव्हान्स टॅक्स’मधून सूट

भारतात राहणाऱ्या ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांचे व्यवसायातून कोणतेही उत्पन्न नाही, त्यांना अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्यातून सूट देण्यात आली आहे. मात्र, याचा अर्थ त्यांचा टॅक्स माफ झाला असा होत नाही; आयटीआर भरताना आवश्यकतेनुसार त्यांना टॅक्स जमा करावा लागतो.

टीडीएस नियमातील मोठा फरक

सामान्य पेन्शनला वेतन मानले जात असल्याने, बँक किंवा पेन्शन देणारी संस्था यावर नियमानुसार टीडीएस कपात करू शकते. तर फॅमिली पेन्शनवर सामान्यतः बँक टीडीएस कापत नाही. मात्र, टीडीएस कट झाला नाही तरीही हे उत्पन्न टॅक्सच्या कक्षेत येते आणि आयटीआर भरताना त्याची माहिती देणे बंधनकारक आहे.

७५ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना विशेष दिलासा

७५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या अशा ज्येष्ठ नागरिकांना काही अटींच्या अधीन राहून आयटीआर दाखल करण्यापासून विशेष सूट मिळते, ज्यांचे उत्पन्न केवळ पेन्शन आणि त्याच पेन्शन खात्यावर मिळणाऱ्या बँकेच्या व्याजापुरते मर्यादित आहे.

आयटीआर भरण्यापूर्वी ही कागदपत्रे तपासा

पेन्शनधारकांनी आपला आयटीआर दाखल करण्यापूर्वी आपली सर्व कागदपत्रे जसे की, फॉर्म १६, एआयएस आणि २६एएस यांमधील माहितीची नीट पडताळणी करून घेतली पाहिजे. योग्य श्रेणीमध्ये उत्पन्नाची माहिती दिल्यास टॅक्सची गणना अचूक होते.