ITR Filing Late Returns Penalty details: जरी तुमची ३१ ऑगस्टची आयटीआर (ITR) भरण्याची मुदत हुकली तरी तुम्ही आयटीआर भरू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला विलंब शुल्क आणि न भरलेल्या करावर व्याज भरावे लागू शकते. ‘असेसमेंट इयर’ २०२६-२७ साठी पात्र करदाते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतीनंतरचे आयटीआर भरू शकतात. ३१ ऑगस्टची ही मुदत अशा करदात्यांना लागू आहे जे ITR-3, ITR-4, ITR-5 किंवा ITR-7 भरतात आणि ज्यांना व्यवसायापासून उत्पन्न आहे, परंतु त्यांच्या हिशोबाचे ऑडिट करणे बंधनकारक नाही.

मुदत संपली तरीही तुम्ही आयटीआर भरू शकता. तुम्ही ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत किंवा ‘असेसमेंट इयर’ पूर्ण होण्यापूर्वी यापैकी जी तारीख आधी येईल तोपर्यंत विलंबित आयटीआर दाखल करू शकता.

मात्र, या विलंबीत आयटीआरसाठी शुल्क आकारले जाते. ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना ५००० रुपये शुल्क भरावे लागू शकते. तर ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांसाठी हे शुल्क १००० रुपये इतके आहे. जर कोणता कर भरणे बाकी असेल तर कलम २३४ अ अंतर्गत न भरलेल्या रकमेवर दरमहा १ टक्के दराने व्याजही आकारले जाऊ शकते.

३१ ऑगस्टची मुदत हुकली म्हणजे तुम्हाला कर परतावा गमवावा लागेल, असे नाही. जर तुम्ही परताव्यासाठी पात्र असाल तर ३१ डिसेंबरपूर्वी ‘विलंबित आयटीआर’ भरून तुम्ही त्याची मागणी करू शकता. परताव्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आयटीआरची पडताळणी होणेही आवश्यक आहे. आयटीआर भरल्यानंतर ई-पडताळणीसाठी प्राप्तिकर विभागाने ३० दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे.

जर तुम्हाला व्यवसाय, शेअर बाजारातील गुंतवणूक किंवा F&O ट्रेडिंगमधून तोटा झाला असेल, तर भविष्यातील वर्षांमध्ये तुमचे करपात्र उत्पन्न कमी करण्यासाठी तुम्ही त्या तोट्याचा वापर करू शकता. परंतु, जर तुम्ही अंतिम मुदतीनंतर तुमचा आयटीआर दाखल केला, तर यापैकी काही तोटे पुढे नेण्याचा तुमचा अधिकार तुम्ही गमावू शकता.

करदात्यांना आयटीआर भरल्यानंतर त्यात काही चूक आढळल्यास किंवा काही माहिती राहून गेल्याचे लक्षात आल्यास, ते कलम १३९(५) अन्वये सुधारित आयटीआर दाखल करू शकतात. ‘असेसमेंट इयर’ २०२६-२७ साठी, सुधारित आयटीआर साधारणपणे ३१ मार्च २०२७ पर्यंत किंवा कर-निर्धारण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यांपैकी जी तारीख आधी येईल तोपर्यंत दाखल करता येते.