जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदी दरात घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. दरवाढीनंतर ठप्प झालेले व्यवहार पुन्हा सुरळीत झाल्याने सुवर्ण व्यावसायिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी दोन्ही धातुंच्या दरात पुन्हा मोठा बदल झाल्याने खळबळ उडाली.

गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आठवड्याच्या शेवटी मात्र या मौल्यवान धातूंमध्ये थोडीशी वाढ नोंदवण्यात आली. जागतिक घडामोडी, डॉलरमधील हालचाल आणि व्याजदरांबाबतची अनिश्चितता यांचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

भारतात सोने आणि चांदी यांना केवळ गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहिले जात नाही, तर त्यांना सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्वही आहे. लग्न समारंभ, सण-उत्सव किंवा अन्य शुभ प्रसंगी सोने-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. समृद्धी, शुभता आणि सकारात्मकतेचे प्रतीक म्हणून या धातूंना भारतीय समाजात विशेष स्थान आहे.

पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेमुळे सोने आणि चांदी ही केवळ दागिन्यांपुरती मर्यादित न राहता भविष्यासाठी सुरक्षित संपत्ती म्हणूनही पाहिली जातात. आर्थिक अस्थिरतेच्या काळात अनेक गुंतवणूकदारांचा कल आजही सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून दिसून येत आहे. त्यामुळेच किमतींमध्ये चढ-उतार होत असतानाही भारतीय बाजारात सोन्या-चांदीची मागणी कायम राहिल्याचे चित्र आहे.

आगामी काळात सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराई सुरू होणार असल्याने सोन्या-चांदीच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या दिवसांत दोन्ही धातुंच्या दरांमध्ये आणखी हालचाल दिसून येईल, असा अंदाज बाजारातील जाणकार व्यक्त करत आहेत.

सोन्याच्या दरात काय बदल ?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरूवारी ५०४३ रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५८ हजार १०५ रुपयांपर्यंत खाली आले होते. तसेच शुक्रवारी दिवसभरात आणखी ५१५ रूपयांची घट नोंदवली गेल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५७ हजार ५९० रूपयांपर्यंत घसरले होते. मात्र, शनिवारी सकाळी बाजार उघडल्यावर १९५७ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५९ हजार ५४७ रूपयांपर्यंत वधारले.

चांदीच्या दरात काय बदल ?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरूवारी तब्बल २७ हजार ८९० रूपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७० हजार ८९० रुपयांपर्यंत घसरले होते. तसेच शुक्रवारी दिवसभरात पुन्हा १० हजार ३०० रूपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ६० हजार ५९० रूपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, शनिवारी सकाळी बाजार उघडल्यावर तब्बल ८२४० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ६८ हजार ८३० रूपयांपर्यंत वधारले.