Reliance Jio BP petrol pump fuel availability India: रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकतेच सांगितले की, त्यांचे सर्व जिओ-बीपी पेट्रोल पंप पूर्णपणे कार्यरत आहेत आणि ग्राहकांना वितरित केल्या जाणाऱ्या इंधनाच्या प्रमाणावर कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. देशात वाढत्या इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिओ-बीपी पेट्रोल पंपांवर प्रत्येक ग्राहकाच्या इंधन खरेदीवर मर्यादा घातल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर, रिलायन्स समूहाने हे स्पष्टीकरण दिले आहे.
“सर्व जिओ-बीपी पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या सेवेसाठी आम्ही पूर्णपणे कार्यरत असून, तिथे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. आमचे उच्च-कार्यक्षमता असलेले पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून देणे सुरूच आहे. ज्यामुळे कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय अधिक मायलेज मिळते आणि आमच्या ग्राहकांना अधिक मोबदला मिळण्याची खात्री मिळते”, असे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्याने सांगितले.
“ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या इंधनाच्या प्रमाणावर मर्यादा घालणारा कोणताही आदेश नाही. पण, एखाद्या विशिष्ट स्थानिक परिस्थितीमुळे कदाचित असा अनुभव आला असावा. जिओ-बीपी पेट्रोल पंपावर प्रत्येक ग्राहकाला इंधन भरण्याची सेवा पुरवण्याचे आमचे वचन पूर्वीही होते आणि आजही कायम आहे”, असे प्रवक्त्याने पुढे नमूद केले.
सरकारी पेट्रोल पंपांवर इंधन खरेदीची कोणतीही मर्यादा नाही
बहुतांश पेट्रोल पंपांवर नियंत्रण असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या सरकारी कंपन्यांनी इंधन दरवाढ किंवा खरेदीवर मर्यादा लादल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तरीही, काही पंपांवर १,००० रुपयांच्या इंधन खरेदीची मर्यादा लागू केली जात असल्याचे वाहनचालकांनी अनौपचारिकपणे सांगितले आहे.
‘या’ कंपनीने वाढवले दर
इंधन विक्री क्षेत्रातील आणखी एक खाजगी कंपनी असलेल्या ‘नयारा एनर्जी’ने, किरकोळ विक्रीतील तोटा कमी करण्याच्या आणि इंधनाचा वापर मर्यादित करण्याच्या उद्देशाने, गेल्या महिन्यात डिझेल व पेट्रोलच्या किमती वाढवल्या होत्या. बाजारात सुमारे ७% हिस्सा असलेल्या या कंपनीची अंशतः मालकी, रशियन ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या ‘रोसनेफ्ट पीजेएससी’कडे आहे.
इराण-अमेरिका युद्धाची चिंता
भारत आपल्या तेलाच्या गरजेपैकी ९०% पेक्षा जास्त तेल आयात करतो, त्यामुळे पर्शियन आखातातील व्यत्ययांमुळे तो विशेषतः असुरक्षित बनला आहे. होर्मुझ नाकेबंदीचा कालावधी, जागतिक साठा आणि शस्त्रसंधी अयशस्वी होण्याचा धोका या बाबींचा व्यापारी विचार करत असल्याने तेलाच्या किमती अस्थिर राहिल्या आहेत.
ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांमुळे सौदी अरेबियाने आपली उत्पादन क्षमता कमी केल्याचे सांगितल्यानंतर, शुक्रवारी आशियाई व्यापाराच्या सुरुवातीला ब्रेंट क्रूडच्या किमतीत वाढ झाली.
सरकारी हस्तक्षेपामुळे सरकारी मालकीच्या तेल शुद्धीकरण कंपन्यांनी शेवटची पंपावरील दरात कपात मार्च २०२४ मध्ये केली होती. १ एप्रिल रोजी एका पोस्टमध्ये केंद्रीय तेल मंत्रालयाने म्हटले आहे की, इंधन विक्रेत्यांना सध्या विकल्या जाणाऱ्या प्रत्येक लिटर पेट्रोलवर २४.४० रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर १०४.९९ रुपयांचे नुकसान होत आहे.
