PhonePe ITR: आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी, फिनटेक प्लॅटफॉर्म फोनपे आणि जिओ फायनान्सने टॅक्सबडीच्या भागीदारीत ॲपद्वारे कर भरण्याची सेवा सुरू केली आहे. दोन्ही कंपन्या स्वतःहून आणि तज्ञांच्या मदतीने आयटीआर दाखल करण्याचे पर्याय देत आहेत, ज्यामध्ये सेल्फ-फायलिंग प्लॅन्स अवघ्या २४ रुपयांपासून सुरू होत आहेत.

या सेवा पगारदार व्यक्ती तसेच आयटीआर भरण्याच्या अधिक गुंतागुंतीच्या गरजा असलेल्या करदात्यांसाठी आहेत. यामध्ये व्यावसायिक उत्पन्न, भांडवली नफा, क्रिप्टोकरन्सी व्यवहार, विदेशातील उत्पन्न आणि अनिवासी भारतीय यांच्या आयटीआरचा समावेश आहे.

आयटीआर भरण्याच्या सुविधा टॅक्सबडीद्वारे पुरवल्या जातील आणि त्या या दोन ॲप्समध्ये उपलब्ध आहेत. यामुळे युजर्सना बाह्य पोर्टल्सवर न जाताच आयटीआर दाखल करता येणार आहे.

जिओफायनान्सने सांगितले की, त्यांच्या टॅक्स फाइलिंग प्रणालीमध्ये आयकर विभागाच्या पोर्टलवरून डेटा मिळवणे, कर नियोजन टूल्स, कर प्रणालीची तुलना, कलम ८० सी आणि ८० डी सारख्या तरतुदींनुसार कपातीचा अंदाज आणि परतावा ट्रॅकिंग यांसारख्या फिचर्सचा समावेश आहे. कंपनीने सांगितले की, करदात्यांच्या डेटावर केवळ आयटीआर दाखल करण्याच्या उद्देशाने टॅक्सबडीच्या नियंत्रित चौकटीत प्रक्रिया केली जाईल.

फोनपेने सांगितले की, त्यांच्या या नवीन फिचरमुळे युजर्सना ॲपमधूनच आयटीआर दाखल करणे आणि मासिक जीएसटी व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे. सेल्फ-फायलिंग व्यतिरिक्त, ते गुंतागुंतीच्या कर परिस्थितींसाठी तज्ञांच्या मदतीने फायलिंग आणि फ्रीलान्सर्स व लहान व्यवसायांसाठी जीएसटी फायलिंग सेवा देखील उपलब्ध असणार आहे.

दोन्ही प्लॅटफॉर्म्सनी २४ रुपयांपासून सुरू होणारे सेल्फ-फायलिंग प्लॅन्स सादर केले असलेतरी, जिओफायनान्सने शुल्कांची तपशीलवार रचना जाहीर केली आहे. पगारदार करदात्यांसाठी सेल्फ-फायलिंगचे शुल्क वार्षिक उत्पन्नानुसार २४ रुपयांपासून ४९९ रुपयांपर्यंत आहे. तर भांडवली नफा, क्रिप्टोकरन्सी किंवा फ्युचर्स अँड ऑप्शन्स उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठीचे प्लॅन्स ९९ रुपयांपासून सुरू होतात.

टॅक्स फाइलिंग व्यतिरिक्त, जिओ फायनान्सने ही सेवा त्यांच्या जिओपॉइंट्स रिवॉर्ड्स प्रोग्रामशी जोडली आहे, ज्या अंतर्गत युजर्सना अटी व शर्तींच्या अधीन राहून, फाइलिंग शुल्काच्या २५% पर्यंतचे रिडीम करण्यायोग्य रिवॉर्ड्स मिळू शकतात.