Jio Financial Services Q1 Results update on net profit and revenue growth: जिओ ‘आयपीओ’च्या तोंडावर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा ३० जून रोजी संपलेल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा १५६ टक्क्यांनी वाढून ८३० कोटी रुपये झाला आहे. याआधीच्या वर्षीच्या याच कालावधीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ३२५ कोटी रुपये होता. याबाबत कंपनीने १६ जुलै रोजी माहिती दिली आहे.

जिओ फायनान्शिअल ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या एकत्रित महसुलातही मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीतील ६१२ कोटी रुपयांच्या तुलनेत, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हा महसूल २२७ टक्क्यांनी वाढून २,००४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील तिमाहीच्या (Q4 FY26) २७२ कोटी रुपयांच्या तुलनेत निव्वळ नफ्यात २०५ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.

परिचालन खर्चात मोठी वाढ होऊनही, एकूण उत्पन्नात वार्षिक आधारावर १४१ टक्क्यांची वाढ झाली आणि तो १,४९६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या वाढीमागे प्रामुख्याने व्याजदराद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातील १६५ टक्क्यांची वाढ हे मुख्य कारण होते. तसेच, शुल्क आणि कमिशनद्वारे मिळणारे उत्पन्न पाच पटींनी वाढून ३२५ कोटी रुपये झाले. या तिमाहीत कंपनीला ५०९ कोटी रुपयांचे लाभांश उत्पन्न (Dividend income) देखील मिळाले आहे.

एआय आणि डेटा ॲनालिटिक्सचा वापर

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ, हितेश सेठिया म्हणाले, “आमच्या विविध व्यावसायिक विभागांमधील सातत्यपूर्ण प्रगती ही आमच्या ‘फुल-स्टॅक’ इकोसिस्टमची सूक्ष्म आणि सुनियोजित रचना तसेच आमच्या अंमलबजावणीची क्षमता सिद्ध करते. एआय (AI) आणि डेटा ॲनालिटिक्सचा धोरणात्मक वापर करून, आम्ही संपूर्ण मूल्य साखळीमध्ये कार्यक्षमतेत मोठी वाढ साध्य केली आहे. आम्ही आमच्या ग्राहकांच्या गरजांनुसार तयार केलेल्या कर्जविषयक सेवांमध्ये दमदार वाढ करत आहोत. तसेच, आमच्या ॲसेट मॅनेजमेंट विभागाद्वारे नाविन्यपूर्ण गुंतवणूक उत्पादनांची उपलब्धता वाढवत आहोत.”

“यासोबतच, महसुलाचे विविध स्रोत निर्माण करून आणि ‘युनिट इकॉनॉमिक्स’वर काटेकोर लक्ष केंद्रित करून आम्ही आमच्या पेमेंट्स व्यवसायात मोठी सुधारणा घडवून आणत आहोत. गुंतवणूक आणि विमा यांसारख्या क्षेत्रांमध्ये देशांतर्गत बाजारपेठेत खोलवर पोहोचण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. त्यामुळे, आम्ही या क्षेत्रांमधील ब्लॅकरॉक आणि अलियान्झ यांच्यासोबतच्या संयुक्त उपक्रमांसह आमच्या काही नवीन व्यवसायांमध्ये गुंतवणुकीचा वेग वाढवत आहोत. ज्यातून कालांतराने आम्हाला मोठे फायदे मिळतील”, असे त्यांनी पुढे म्हटले.